UFO Investigation : पृथ्वीबाहेरील जीवांचा शोध निर्णायक टप्प्यात; व्हाईट हाऊसची विशेष टीम मैदानात; हार्वर्डचे वैज्ञानिकही सामील ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
UFO Investigation White House 2026 : गेल्या अनेक दशकांपासून मानवाला पडलेले सर्वात मोठे कोडे म्हणजे “विश्वात आपण एकटेच आहोत का?” या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आता अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने (America) एक ऐतिहासिक आणि धाडसी पाऊल उचलले आहे. आकाशात दिसणाऱ्या रहस्यमय उडणाऱ्या वस्तू (UFOs) आणि परग्रहवासीयांच्या अस्तित्वाबद्दल सुरू असलेल्या चर्चांना आता अधिकृत आणि वैज्ञानिक जोड देण्यासाठी, अमेरिकेने हार्वर्ड विद्यापीठाचे प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ एवी लोएब (Avi Loeb) यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन वैज्ञानिक सल्लागार परिषद स्थापन केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पारदर्शक धोरणांनुसार, ही समिती आता अमेरिकन लष्करी जवानांनी मागील काही वर्षांत टिपलेल्या यूएपी (Unidentified Aerial Phenomena) घटनांचे बारकाईने विश्लेषण करणार आहे.
या मोहिमेचे नेतृत्व करणारे एवी लोएब हे खगोलशास्त्रातील एक अत्यंत चर्चित नाव आहे. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठाच्या खगोलशास्त्र विभागाचे अध्यक्ष म्हणून सुमारे १० वर्षे जबाबदारी सांभाळली आहे. २०१७ मध्ये जेव्हा ‘ओमुआमुआ’ (Oumuamua) नावाची एक रहस्यमय वस्तू सूर्यमालेतून वेगाने गेली, तेव्हा लोएब यांनी असा दावा केला होता की, ती वस्तू नैसर्गिक नसून एखादे परग्रही अंतराळयान असू शकते. त्यांच्या या विधानाने खगोलशास्त्रीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अनेक सहकाऱ्यांनी त्यांच्याशी असहमती दर्शवली असली, तरी लोएब आपल्या सिद्धांतावर ठाम राहिले. २०२३ मध्ये त्यांनी पॅसिफिक महासागरातून धातूचे काही सूक्ष्म कण शोधून काढले होते, जे एलियन तंत्रज्ञानाचे भाग असावेत असा त्यांचा दावा होता. आता त्याच संशोधकाच्या हाती व्हाईट हाऊसने या रहस्यमय तपासाची धुरा सोपवली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Netanyahu US Aid: ‘इस्रायल आता अमेरिकचे ‘पिल्लू’ राहणार नाही; ट्रम्पना थेट सुनावत नेतन्याहूंचे मोदींच्या पावलावर पाऊल
एव्ही लोएब यांच्या सोबतीला या पथकात केवळ पुस्तकी शास्त्रज्ञच नाहीत, तर प्रत्यक्ष अनुभवाचे धनी असलेले दिग्गजही आहेत. यामध्ये अमेरिकेच्या नौदलातील निवृत्त रिअर ॲडमिरल टिमोथी गॅलॉडेट (Tim Gallaudet) यांचा समावेश आहे, ज्यांनी यापूर्वीच मानवातीत बुद्धिमत्तेचे पुरावे अस्तित्वात असल्याचा दावा केला आहे. याव्यतिरिक्त, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि अब्जाधीश उद्योगपती बेन लॅम (Ben Lamm) हे देखील या समितीचा भाग आहेत. संशोधनासाठी लागणारी प्रगत संसाधने आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा मेळ घालत हे पथक आता कामाला लागले आहे.
समितीने स्थापनेनंतरच्या पहिल्याच बैठकीत आक्रमक पवित्रा घेत पेंटागॉनकडे माहितीचा साठा मागितला आहे. यामध्ये यूएपीशी संबंधित ५० हून अधिक उच्च-गुणवत्तेचे व्हिडिओ, असंख्य छायाचित्रे आणि रडार डेटाचा समावेश आहे. लोएब यांचा असा ठाम विश्वास आहे की, आतापर्यंत दडपून ठेवलेली किंवा दुर्लक्षित केलेली माहिती जर योग्य वैज्ञानिक पद्धतीने तपासली, तर अनेक दशकांपासून सुरू असलेला एलियन वादावर पडदा पडू शकतो. “आमचे लक्ष केवळ आणि केवळ तथ्यांवर असेल,” असे लोएब यांनी स्पष्ट केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Italy Elections : इटलीच्या राजकीय पटावर नवा डाव! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे नवीन निवडणूक सूत्र; विरोधकांनी का ओढले शरसंधान?
या नियुक्तीनंतर वैज्ञानिक समुदायात दोन गट पडले आहेत. पेंटागॉनचे माजी प्रमुख शॉन किर्कपॅट्रिक यांनी एवी लोएब यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना म्हटले की, लोएब यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षेचा किंवा गुप्तचर यंत्रणांचा अनुभव नाही. त्यामुळे व्हाईट हाऊसने त्यांना नेमून केलेली ही जबाबदारी कितपत यशस्वी होईल, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र, लोएब यांनी या टीकेला न जुमानता सांगितले की, त्यांची दृष्टी केवळ आकाशातील हालचाली आणि वैज्ञानिक सत्यावर केंद्रित आहे. राजकारण किंवा संरक्षण धोरणांचा दबाव तपासावर येऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. आता सर्वांच्या नजरा या विशेष पथकाच्या पहिल्या अहवालाकडे लागल्या आहेत. जर हे पथक खरोखरच काही ठोस पुरावे जगासमोर आणू शकले, तर मानवी इतिहासातील हे सर्वात मोठे आणि क्रांतिकारी शोध ठरेल.






