VSUShooting: व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; ५ जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
अमेरिकेत शैक्षणिक संस्थांमधील बंदूक हिंसाचाराचे (Gun Violence) सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. शनिवारी मध्यरात्री व्हर्जिनिया राज्यातील एट्रिक येथील ऐतिहासिक व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटी (VSU) च्या कॅम्पसमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे दोन दिवस उरलेले असताना घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण विद्यापीठ परिसर आणि अमेरिकेतील शैक्षणिक वर्तुळ हादरले आहे. वसतिगृहाबाहेर झालेल्या या अंधाधुंद गोळीबारात ५ जण जखमी झाले आहेत.
पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी पहाटे सुमारे १:३० वाजता विद्यापीठाच्या ‘क्वाड ॲनेक्स’जवळील बोइसो स्ट्रीटवर घडली. अचानक झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने झोपेत असलेले विद्यार्थी दचकून जागे झाले. घटनेची माहिती मिळताच चेस्टरफील्ड काउंटी पोलीस आणि व्हीएसयू कॅम्पस पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी वसतिगृहाबाहेर ५ जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांना त्वरित जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. जखमींमध्ये एकाची प्रकृती अत्यंत गंभीर (Critical) असून इतर चौघे धोक्याबाहेर आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indonesia Earthquake : इंडोनेशिया 7.7 तीव्रतेच्या भूकंपाने हादरले; समुद्राखाली 10 किमी खोलीवर केंद्रबिंदू, त्सुनामीचा अलर्ट जारी
गोळीबारानंतर प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण कॅम्पस तातडीने ‘लॉकडाऊन’ (Lockdown) केला आणि विद्यार्थ्यांना खोल्यांमध्येच राहण्याच्या सूचना दिल्या. तपासादरम्यान पोलिसांनी कॅम्पसमधील एका वसतिगृहाची झाडाझडती घेतली असता, तिथे कपाटात लपून बसलेल्या १९ वर्षीय कॅमरॉन हॅरिस (Camron Harris) या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. हॅरिस हा या विद्यापीठाचा विद्यार्थी नसून, त्याच्यावर प्राणघातक हल्ला आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेत इतरही संशयित सहभागी असण्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
BREAKING Multiple shooters STILL at large hours after rampage at Virginia State University days before classes begin None of the victims were killed in the 1.30am shooting, but one is fighting for their life in hospital as of Saturday evening. Campus police and Chesterfield… pic.twitter.com/J5OjvVuSl4 — SANTINO (@TheRealSantino) August 16, 2026
credit – social media and Twitter
या दुर्घटनेत जखमी झालेल्या ५ जणांमध्ये १७ ते २३ वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. यापैकी एक २० वर्षांचा तरुण हा विद्यापीठाचा अधिकृत विद्यार्थी असून उपचारांनंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. इतर जखमी हे आसपासच्या परिसरातील नागरिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या कॅम्पसमधील लॉकडाऊन हटवण्यात आला असला, तरी कायदा व सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Giorgia Meloni vs Gen Z: इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यावर का भडकली तरुण पिढी? 2027 मध्ये सत्तापालटाची शक्यता
१८८२ मध्ये स्थापन झालेले व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटी (VSU) हे कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांसाठी (HBCU) राज्य-समर्थित पहिले चार वर्षांचे ऐतिहासिक महाविद्यालय आहे. सध्या सुमारे ५,७०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या एका आठवड्यापूर्वीच विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल उघडण्यात आले होते आणि नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ‘न्यू ट्रोजन एक्सपिरियन्स’ हा स्वागत सोहळा उत्साहात पूर्ण केला होता. सोमवारपासून नियमित वर्ग सुरू होणार असतानाच घडलेल्या या घटनेने विद्यार्थी आणि दूरवरून आलेल्या पालकांच्या मनात सुरक्षेबाबत मोठी भीती निर्माण केली आहे.
अमेरिकेत या वर्षात आतापर्यंत सार्वजनिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सामूहिक गोळीबाराच्या (Mass Shootings) शेकडो घटना नोंदवल्या गेल्या आहेत. या ताज्या घटनेमुळे अमेरिकेतील ढिसाळ बंदूक नियंत्रण कायद्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा जगभरातून तीव्र टीका होत आहे.
