महासभेतील गोंधळ रोखण्यासाठी SOP; पण त्याच नियमावलीवरून महासभेतच रणकंदन!
विजय काते, भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेत नव्याने तयार करण्यात आलेल्या मानक कार्यपद्धतीवरून (SOP) जोरदार राजकीय वादंग निर्माण झाला. महासभेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिक आणि पत्रकारांच्या प्रवेशासाठी लागू केलेल्या नव्या नियमावलीला विरोधी पक्षनेत्या आफरीन सय्यद यांनी तीव्र विरोध दर्शविला. सभागृहात आक्रमक भूमिका घेत त्यांनी महापौरांसमोरच SOP ची प्रत फाडून तिचे तुकडे केले. त्यांच्या या कृतीमुळे महासभेत वातावरण चांगलेच तापले.(Mira Bhayandar News)
काही दिवसांपूर्वी १६ ऑक्टोबर रोजी मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेत अभ्यागतांच्या दालनात काही व्यक्तींनी प्रवेश करून गोंधळ घातल्याची घटना घडली होती. या प्रकारामुळे महासभेच्या कामकाजात व्यत्यय निर्माण झाला होता. या घटनेनंतर महासभेतील प्रवेश नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र SOP तयार केली. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या नियमावलीत नागरिक, पत्रकार, सुरक्षा कर्मचारी आणि संबंधित प्रशासकीय विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
मात्र, या नियमावलीतील काही तरतुदींवरून आता राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. विशेषतः नागरिकांना महासभेचे कामकाज पाहण्यासाठी तीन दिवस आधी लेखी अर्ज करणे बंधनकारक करणे आणि महापौर अथवा पीठासीन अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीनंतरच प्रवेश पास देण्याची तरतूद विरोधकांच्या आक्षेपाचे कारण ठरली आहे.
नव्या SOP नुसार, महासभेला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या नागरिकांना बैठकीच्या किमान तीन दिवस आधी नगरसचिवांकडे स्वतः उपस्थित राहून लेखी अर्ज करावा लागणार आहे. विशेष सभा आणि तहकूब सभेसाठी ४८ तास आधी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारणे किंवा नाकारणे याचे अधिकार महापौर तथा पीठासीन अधिकारी किंवा नगरसचिवांकडे राखीव ठेवण्यात आले आहेत.
याशिवाय सभागृहातील उपलब्ध आसनक्षमतेनुसार नागरिकांना प्रवेश पास दिले जाणार आहेत. महासभेचे कामकाज जेवणापूर्वी आणि जेवणानंतर अशा दोन सत्रांत होणार असल्याने नागरिकांना अर्ज करताना कोणत्या सत्रात उपस्थित राहायचे आहे, हेही नमूद करावे लागणार आहे. पहिल्या सत्रात जागा उपलब्ध न झाल्यास दुसऱ्या सत्रात प्रवेश दिला जाणार आहे.
या प्रक्रियेमुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या लोकप्रतिनिधींच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठीही पूर्वपरवानगी घ्यावी लागणार असल्याचा आक्षेप विरोधकांकडून घेतला जात आहे.
नागरिकांप्रमाणेच पत्रकारांसाठीही स्वतंत्र प्रवेश पासची व्यवस्था करण्यात आली आहे. पत्रकारांचे अधिकृत ओळखपत्र तपासून संबंधित वृत्तसंस्थेकडून खातरजमा केली जाणार आहे. पत्रकारांसाठी प्रवेश पासची संख्या निश्चित केली जाणार असून स्वतंत्र नोंदवहीही ठेवण्यात येणार आहे. तसेच महासभेच्या कामकाजाचे चित्रीकरण आणि थेट प्रक्षेपण करण्यासाठी परवानगी आवश्यक असल्याचे नियमावलीत नमूद आहे.
अनधिकृत चित्रीकरण, फोटोग्राफी किंवा सभेच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्यास लागू कायद्यानुसार कारवाई आणि संबंधित व्यक्तींना महासभेत प्रवेशबंदी करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या सर्व तरतुदींवरून महासभेत विरोधी पक्षनेत्या आफरीन सय्यद यांनी आक्रमक भूमिका घेतली. नागरिक आणि पत्रकारांच्या प्रवेशावर नियंत्रण आणणाऱ्या या नियमावलीला त्यांनी विरोध दर्शविला. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना आपल्या महापालिकेच्या सभेचे कामकाज पाहण्याचा आणि पत्रकारांना त्याचे वृत्तांकन करण्याचा अधिकार महत्त्वाचा असल्याचा मुद्दा या वादाच्या केंद्रस्थानी आहे.
याच संतापातून आफरीन सय्यद यांनी सभागृहात महापौरांसमोरच SOP ची प्रत फाडून तिचे तुकडे केले. त्यांच्या या कृतीतून त्यांनी प्रशासनाच्या नव्या नियमावलीविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. त्यामुळे महासभेत पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष चर्चेचा विषय ठरला.
महासभेत शिस्त आणि सुरक्षा राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असली, तरी त्याचवेळी नागरिकांचा सहभाग आणि पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित राहणेही आवश्यक आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने तयार केलेल्या SOP मध्ये प्रवेशासाठी आगाऊ अर्ज करण्याची प्रक्रिया ही नागरिकांच्या वैधानिक सार्वजनिक प्रवेशाच्या अधिकारांवर मर्यादा आणणारी नसल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आता या नियमावलीची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, नागरिकांचे अर्ज कोणत्या निकषांवर मंजूर किंवा नामंजूर केले जातात आणि पत्रकारांना वृत्तांकनासाठी किती स्वातंत्र्य दिले जाते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
१६ ऑक्टोबरच्या गोंधळानंतर प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेसाठी तयार केलेली SOP आता नव्या राजकीय संघर्षाचे कारण बनली आहे. सुरक्षा की लोकशाहीतील पारदर्शकता, हा प्रश्न मीरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.
Ans: महासभेतील गोंधळ रोखण्यासाठी प्रशासनाने तयार केलेल्या SOP आणि नागरिक व पत्रकारांच्या प्रवेशावरील निर्बंधांवरून गोंधळ झाला.
Ans: विरोधी पक्षनेत्या आफरीन सय्यद यांनी प्रशासनाच्या नियमावलीला तीव्र विरोध केला.
Ans: महापौरांसमोरच SOP च्या नियमावलीची प्रत फाडून त्यांनी निषेध व्यक्त केला. नागरिकांना महासभा पाहण्यासाठी तीन दिवस आधी अर्ज करण्याची अट कशासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.






