(फोटो सौजन्य-AI एआय)
तालुक्यातील ब्राह्मणी गावात मंगळवारी, रात्री घडलेल्या एका विचित्र घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले. गावातील अनेक प्रमुख चौक आणि रस्त्यांवर अचानक रंगोळी काढून त्यावर लिंबू ठेवून पूजा-अर्चना केल्याचे प्रकार समोर आले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामस्थांचे लक्ष या प्रकाराकडे जाताच गावात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. गावातील केवळ एकाच ठिकाणी नव्हे, तर अनेक वेगवेगळ्या चौकांमध्ये अशा प्रकारे एकसारख्या हालचाली दिसून आल्याने ग्रामस्थांच्या शंकेत आणखी भर पडली. रात्रीच्या वेळी अचानक विविध ठिकाणी रंगोळी आणि त्यावर लिंबू ठेवल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच लोकांनी घराबाहेर पडून परिस्थितीची पाहणी केली.
Bhandara News: एकलारीत वीजतारा तुटून ३ शेळ्यांचा मृत्यू! महावितरणाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
ग्रामस्थांची प्रशासनाकडे चौकशीची मागणी
या प्रकारामुळे रात्रीच्या वेळी ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले. काहींनी सुरक्षेचा उपाय म्हणून महिला व लहान मुलांना रात्री घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला. या प्रकारामुळे गावात अनावश्यक गैरसमज आणि अफवांचा बाजार गरम झाला असून, या घटनेमागील सत्यता समोर येणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे गावात भीतीचे व अफवांचे वातावरण तयार होत असल्याने ग्रामस्थांनी पोलिस व प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य तपास करावा, अशी मागणी केली आहे
काही ग्रामस्थांनी हा प्रकार अंधश्रद्धेशी व अघोरी प्रथेसी जोडला, तर काहींनी हा गुप्त पूजा-अर्चना किंवा विधीचा भाग असल्याचा अंदाज वर्तविला. मात्र, हे कृत्य नेमके कोणी केले आणि कोणत्या उद्देशाने करण्यात आले, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.






