फोटो सौजन्य: iStock
सरकारने वाहनांवरील GST कमी करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. अशातच GST कपातीनंतर Maruti Wagon R वर ग्राहकांना किती रुपयांची बचत करता येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.
कार खरेदी करताना आपल्याला टॅक्स म्हणून जीएसटी द्यावा लागतो. हाच टॅक्स भरणे अनेक जणांना आवडत नसते. या टॅक्समुळे कारवर अतिरिक्त हजारो रुपये खरेदीदारांना द्यावे लागते. त्यामुळे नेहमीच कार खरेदीदार GST कपातीच्या प्रतीक्षेत असतात. अशातच आता केंद्र सरकारने नागरिकांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
सध्या देशात जीएसटी कपात हा सर्वात मोठा चर्चेचा विषय बनत आहे. केंद्र सरकारने 3 सप्टेंबर 2025 च्या रात्री नवीन जीएसटी स्लॅबला मंजुरी दिली आहे. यामध्ये कारवरील कर 28% वरून 18% पर्यंत कमी करण्यात आला आहे. हा नवीन नियम 22 सप्टेंबरपासून लागू होईल. याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांच्या खिशावर होईल, कारण आता कार पूर्वीपेक्षा स्वस्त होणार आहेत. या कारणास्तव, मारुती सुझुकीची सर्वात लोकप्रिय कार Wagon R सुमारे 67,000 रुपयांनी स्वस्त होऊ शकते.
खरंतर, मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर.सी. भार्गव यांनी स्वतः सांगितले की, जीएसटी कपातीमुळे वॅगन आरची किंमत कमी होईल. त्यांनी सांगितले की, वॅगन आरची किंमत 60 ते 67 हजार रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. त्याच वेळी, लहान कारमधील अल्टोची किंमतही 40000 ते 50000 रुपयांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. याचा अर्थ ग्राहकांना आता कमी किमतीत भारतातील लोकप्रिय कार खरेदी करता येणार आहे. याचा फायदा केवळ लोकांनाच होणार नाही तर यामुळे कंपनीच्या विक्रीतही वाढ होईल.
GST Council ने लहान कारवरील टॅक्स 18% पर्यंत कमी केला आहे. यामध्ये 1200 सीसी पर्यंत इंजिन असलेल्या आणि 4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या कारचा समावेश आहे. त्याच वेळी, 1200 सीसीपेक्षा मोठे आणि 4 मीटरपेक्षा जास्त लांबीचे इंजिन असलेल्या कारवर आता 40% जीएसटी आकारला जाईल. पूर्वी, जीएसटी व्यतिरिक्त, या वाहनांवर 22% सेस देखील आकारला जात होता, ज्यामुळे एकूण टॅक्स 50% पर्यंत पोहोचला. आता तो 40% पर्यंत कमी केला जाईल.
भार्गवांचा असा विश्वास आहे की जीएसटी कपातीमुळे कार बाजारात नवीन उमेद जागी होईल. ते म्हणाले की, लहान कारचा बाजार जो कमी होत होता, तो आता 10% पेक्षा जास्त वाढू शकतो. तसेच, संपूर्ण प्रवासी कार बाजार 6-8% ने वाढण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, व्याजदरात कपात आणि उत्पन्न करातील फायद्यांमुळे ग्राहकांचे पैसे अधिक वाचतील.