जानेवारी महिन्यात मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत वार्षिक आधारावर 15.4 टक्के इतकी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, डिसेंबरच्या तुलनेत ही वाढ तब्बल 22.1 टक्के इतकी मोठी आहे. दुसरीकडे, हलक्या व्यावसायिक वाहनांच्या (LCV) विभागानेही आपली पकड मजबूत केली असून, जानेवारीत या विभागात 14.9 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
व्यावसायिक वाहनांवरील जीएसटी दरात कपात केल्यामुळे वाहनांच्या किमती कमी झाल्या आहेत. याचा थेट फायदा लॉजिस्टिक कंपन्या आणि ट्रान्सपोर्टर्सना झाला आहे. आर्थिक वर्ष2026 च्या सुरुवातीच्या काही महिन्यांतच घाऊक विक्रीत (Wholesale) 11.3 टक्के आणि किरकोळ विक्रीत (Retail) 8.5 टक्के वाढ झाली असून, हे चित्र उद्योगासाठी अत्यंत सकारात्मक आहे.
ICRA च्या अंदाजानुसार, ही तेजी केवळ एका महिन्यापुरती मर्यादित नसून भविष्यातही कायम राहणार असल्याचं बोललं जात आहे. आर्थिक वर्ष 2026: घाऊक विक्री 7-9 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. यात LCV विभाग 9-11 टक्क्यांनी तर M&HCV विभाग 7-9 टक्क्यांनी वाढू शकतो. बस विभाग: सार्वजनिक वाहतूक आणि खाजगी ट्रॅव्हल्सची वाढती मागणी लक्षात घेता, बस विभागात 8-10 टक्क्यांनी वाढीचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2027 : या वर्षात वाढीचा दर थोडा स्थिरावून 4-6 टक्क्यांवर राहण्याची शक्यता आहे.






