(फोटो सौजन्य-AI एआय)
ऑडी इंडिया आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करण्यावर, ग्राहकांच्या अनुभवाला अधिक आनंददायी करण्यावर आणि देशभरात आपली उपस्थिती वाढवण्यावर भर देत वाढीच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत आहे. कंपनीने २०२७ पर्यंत तीन नवीन उत्पादने लाँच करण्याची पुष्टी केली आहे, ज्याची सुरुवात आगामी सणासुदीच्या काळात नवीन ऑडी क्यू३ ने होईल, त्यानंतर २०२७ मध्ये नेक्स्ट-जनरेशन ऑडी ए५ आणि फ्लॅगशिप ऑडी क्यू९ लाँच केली जाईल.
ऑडी इंडिया २०२७ च्या अखेरपर्यंत द्वितीय व तृतीय श्रेणीच्या बाजारपेठांवर अधिक लक्ष केंद्रित करून आपले रिटेल नेटवर्क २५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढवण्याची योजना आखत आहे. ग्राहकांना अधिक आकर्षक आणि डिजिटल-फर्स्ट रिटेल अनुभव देण्यासाठी विद्यमान डीलरशिप्स देखील ब्रँडच्या जागतिक प्रोग्रेसिव्ह शोरूम संकल्पनेसह अपग्रेड केले जात आहेत.
ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्टर बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “आम्ही नवीन उत्पादनांची प्रबळ श्रेणी आणि बाजारपेठेतील सतत गुंतवणुकीच्या जोरावर ऑडी इंडियाच्या वाढीचा पुढील टप्पा तयार करत आहोत. आम्ही सर्व विभागांमध्ये नवीन मॉडेल्स सादर करत असताना ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यावर आणि भारतातील लक्झरी कार बाजारपेठेमध्ये आमची उपस्थिती अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्हाला पुढील तीन वर्षांत आमचा बाजारपेठेतील हिस्सा सध्याच्या ८ टक्क्यांवरून दुप्पट करायचा आहे.”
कंपनी आपल्या डीलर नेटवर्कमधील २,५०० पेक्षा जास्त सेल्स आणि सर्व्हिस प्रोफेशनल्सना प्रशिक्षण देऊन आपल्या ग्राहक परिसंस्थेला दृढ करण्यासाठी गुंतवणूक करत आहे. ऑडी अप्रूव्हड प्लस सारखे उपक्रम ग्राहकांना विश्वासार्ह आणि विनासायास प्री-ओन्ड लक्झरी कारचा अनुभव देऊन मालकीहक्काचा प्रवास अधिक उत्साहवर्धक करत आहेत. ग्राहकांची निष्ठा प्रमुख ताकद आहे, जिथे आज भारतात विकली जाणारी प्रत्येक तिसरी ऑडी ही सध्याच्या ऑडी ग्राहकाकडून खरेदी केली जात आहे.
ऑडी इंडियाचा विश्वास आहे की, वाढती समृद्धी, प्रीमियम मोबिलिटीची वाढती मागणी आणि मेट्रो शहरांपलीकडे वाढणारा ग्राहकवर्ग याच्या पाठिंब्याने देशातील लक्झरी कार बाजारपेठेत दीर्घकालीन क्षमता आहे. कंपनी पुढील वर्षाच्या अखेरीस ४० शोरूम्सपर्यंत आपल्या नेटवर्कचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. कंपनीचे उत्तम उत्पादन पोर्टफोलिओ, व्यापक रिटेल नेटवर्क व सुधारित ग्राहक अनुभवाच्या जोरावर पुढील तीन ते पाच वर्षांत आपला बाजारपेठेतील हिस्सा दुप्पट करण्याचे ध्येय आहे.
नवीन उत्पादनांचे लाँच, नेटवर्क विस्तार आणि सुधारित ग्राहक अनुभव या सर्व बाबींच्या आधारे ऑडी इंडियाचा वाढत्या लक्झरी कार बाजारपेठेमधील आपले स्थान अधिक दृढ करण्याचा आणि आपल्या जागतिक ऑफरिंग्स भारतातील ग्राहकांच्या अधिक जवळ आणण्याचा मनसुबा आहे.






