(फोटो सौजन्य-AI एआय)
पुणे शहराच्या ‘MH-12’ या आयकॉनिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) ओळखीत आता एक मोठा आणि ऐतिहासिक बदल होणार आहे. पुण्यात वाहनांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असून, जुनी नोंदणी सिरीज लवकरच संपुष्टात येत आहे. यावर तोडगा म्हणून पुणे RTO आता वाहनांसाठी ‘MH-12 1A’ ही नवीन सिरीज सुरू करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारे वाहनांच्या क्रमांकामध्ये अंकासह अक्षराचा वापर करण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे.
सध्याच्या नियमानुसार RTO च्या मालिकेत ‘MH-12 AA’ पासून ‘MH-12 ZZ’ पर्यंतची दोन अक्षरे वापरली जातात. मात्र, पुण्यातील गाड्यांची सतत वेगाने वाढती संख्या पाहता या मालिकेतील सर्व उपलब्ध पर्याय आता जवळपास अंतिम टप्प्यात आले आहेत. त्यामुळे मालिकेचा तुटवडा टाळण्यासाठी आणि भविष्यातील लाखो नवीन वाहनांच्या नोंदणीची सोय व्हावी, यासाठी RTO प्रशासनाने हा नाविन्यपूर्ण ऐतिहासिक प्रस्ताव तयार केला आहे.
या नवीन नोंदणी पद्धतीमध्ये ‘MH-12’ नंतर लगेचच एका अंकाचा आणि त्यानंतर एका अक्षराचा (उदा. 1A, 1B, 2A) समावेश केला जाईल. या नव्या प्रयोगामुळे पुणे RTO ला वाहनांच्या नोंदणीसाठी अब्जावधी नवीन क्रमांक सहज उपलब्ध होणार आहेत.
सध्या हा प्रस्ताव मंजुरीच्या शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच पुण्यातील रस्त्यांवर या नव्या सिरीजच्या गाड्या धावताना दिसतील. या निर्णयामुळे वाहनधारकांना नंबर्सची टंचाई भासणार नाही. ऑटोमोबाईल आणि परिवहन क्षेत्रात पुण्यातील हा नवा प्रयोग संपूर्ण देशासाठी एक नवा मार्गदर्शक टप्पा ठरणार आहे, हे नक्की.






