फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Tata Motors कडून नेक्सॉन कारची सीएनजी व्हेरियंट लॉंच करण्यात आली आहे. नवीन CNG व्हेरियंट लाँच करून टाटाकडून नेक्सॉन लाइन अपचा भारतात विस्तार केला आहे. Tata Nexon iCNG या नवीन व्हेरियंटची भारतीय बाजारपेठेतील एक्स-शोरूम किंमत ही 8.99 लाख रुपये आहे. या कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ आणि ड्युअल-सिलेंडर तंत्रज्ञान तसेच तब्बल 321 लीटरची बूट स्पेस आहे. या कारसह टाटाकडून नेक्सॉन ईव्ही देखील अपडेट करण्यात आली असून त्यामध्ये रेड डार्क प्रकारही सादर करण्यात आला आहे.
टाटा नेक्सॉन iCNG कारची वैशिष्ट्ये, ड्युअल-सिलेंडर तंत्रज्ञान
Nexon iCNG SUV च्या वैशिष्टांबद्दल बोलायचे झाल्यास या कारमध्ये एक मोठा पॅनोरॅमिक सनरूफ आहे. नेव्हिगेशन डिस्प्लेसह 10.25-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सुरक्षिततेसाठी 6 एअरबॅग्ज, ESP ( इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम) आणि संपूर्ण श्रेणीमध्ये मानक बाबींचा समावेश आहे. सर्वात प्रमुख म्हणजे या कॉम्पॅक्ट SUV मध्ये तब्बल 321 लीटरचे बूट स्पेस आहे. याकरिता टाटा मोटर्सकडून ड्युअल-सिलेंडर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कंपनीने दावा केला आहे की, Nexon iCNG ही कार ग्राहकांना जास्त सुरक्षा, आराम आणि सुविधा देईल.
टाटा नेक्सॉन आयसीएनजी (Tata Nexon iCNG) पॉवरट्रेन
टाटा नेक्सॉन आयसीएनजी ही कार 1.2L टर्बो-पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे जे 100 Hp पॉवर आउटपुट आणि 170 Nm कमाल टॉर्क देते. कारचे टर्बो-पेट्रोल इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध असणार आहे. नवीन टाटा नेक्सॉन आयसीएनजी ही 8 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे. या 8 प्रकारांमुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार कार खरेदी करता येईल.
टाटा नेक्सॉन रेड डार्क प्रकार
टाटा नेक्सॉनमध्ये कंपनीने रेड डार्क प्रकार सादर केला आहे. हा प्रकार हॅरियर आणि सफारी सारख्या कारमध्ये यशस्वी झाला आहे. या प्रकारात मानक मॉडेलच्या तुलनेत अद्ययावत इंटीरियर आहे.
टाटा नेक्सॉन अपडेटेड ईव्ही (Tata Nexon EV)
टाटा मोटर्सकडून Nexon EV ही देखील अपडेट केली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख रुपये आहे. Tata Nexon EV मध्ये एक मोठा 45 kWh बॅटरी पॅक आहे जो 489 किमीची रेंज ऑफर करतो असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. मात्र या बॅटरी पॅकची रिअल-वर्ल्ड रेंज 350-370 किमीच्या रेंजमध्ये असू शकते.