फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने जरी वाढ होत असली तरी CNG वाहनांची मागणी कमी झालेली नाही. जास्त मायलेज मिळवू इच्छिणारे बहुतेक लोक सीएनजी कार खरेदी करतात. पेट्रोल आणि डिझेलपेक्षा या कार जास्त मायलेज देतात. मात्र, जेव्हा कधी आपण कारमध्ये सीएनजी भरत असतो तेव्हा ड्रायव्हर आपल्याला कारमधून उतरायला सांगतो. असे का? चला याबद्दल जाणून घेऊयात.
CNG (कंप्रेस्ड नॅचरल गॅस) ही अत्यंत जास्त दाबाखाली म्हणजेच सुमारे 200 ते 250 PSI (पाउंड प्रति वर्ग इंच) – भरली जाते. या उच्च दाबामुळे अगदी किरकोळ गळती झाली तरी मोठा अपघात होऊ शकतो.
CNG भरण्याच्या वेळी जर कुठल्याही कारणाने गॅस लीक झाली, तर वाहनाच्या आत बसलेले प्रवासी धोक्यात येऊ शकतात. मात्र बाहेर उभे राहिल्यास जीव वाचवण्याची शक्यता अधिक असते.
कारच्या आत कधीकधी घर्षणामुळे स्थिर वीज तयार होते. गॅस लीक झाल्यास या स्थिर विजेची लहानशी ठिणगीदेखील आगीचा धोका निर्माण करू शकते.
CNG ला एक वेगळा वास असतो, जो काही लोकांमध्ये डोकेदुखी, चक्कर येणे किंवा मळमळ निर्माण करू शकतो. वाहनाबाहेर राहिल्यास या त्रासांपासून बचाव होऊ शकतो.
गॅस भरण्याच्या वेळी टाकी ओव्हरफिल होणार नाही, याची खात्री करणे अत्यावश्यक आहे. टाकीत जास्त दाब निर्माण झाल्यास स्फोट किंवा अपघाताचा धोका वाढतो. वाहनाबाहेर उभे राहिल्यास आपण हे अधिक नीट निरीक्षण करू शकतो.
अनेक वेळा CNG किट बाहेरील मेकॅनिककडून बसवली जाते, आणि गॅस भरणाऱ्या व्यक्तीला त्या किटची फिटिंग किंवा गळतीची योग्य माहिती नसते, ज्यामुळे धोका आणखी वाढतो.
भारतात CNG कार्सची सुरुवात सुमारे 15 वर्षांपूर्वी झाली. मारुती सुझुकी ही पहिली कंपनी होती जिने फॅक्टरी-फिटेड CNG कार्स बाजारात आणल्या. 2010 साली मारुतीने Alto, WagonR आणि Eeco या मॉडेल्समध्ये प्रथमच CNG किट देण्यास सुरुवात केली.
त्याआधी कोणतीही कंपनी फॅक्टरीतून थेट CNG कार विकत नसे; ग्राहकांना कार खरेदी केल्यानंतर मार्केटमध्ये जाऊन किट बसवावी लागत होती. आजच्या काळात मात्र CNG कार्स अधिक प्रगत, सुरक्षित आणि कार्यक्षम बनल्या आहेत.






