दिवाळीचा हंगाम येतोय. फटाक्यांची आतषबाजी होणारच. भलेही ही आतषबाजी क्रिकेटच्या मैदानावरची का असेना! विश्वचषक क्रिकेटचा हंगाम सध्या सुरू आहे; आणि तोही भारतात. कालपरवा ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने दिल्लीत ४० चेंडूतील शतकांची माळ लावली. त्याआधी दिल्लीतच ५६ चेंडूत दक्षिण आफ्रिकेच्या कप्तान एडिअन मार्करमला फटक्यांची आतषबाजी करून शतक झळकविण्याचा मूड आला. मुंबईचे वानखेडे स्टेडियम म्हणजे फलंदाजांसाठी आदर्श मैदान. दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रीच क्लासेनने शनिवारी आपली चौफेर फटक्यांची पोतडीच वानखेडेवर उघडली. ६१ चेंडूच्या त्याच्या डावात फक्त चौकार-षटकारच दिसत होते.
भारताच्या कप्तान रोहित शर्मालाही आपल्या भात्यातील फटके क्रिकेट रसिकांना दाखविण्याचा मूड झाला. रोहितने दिल्लीच्या कोटला मैदानावर चौफेर फटक्यांचे भेंडोळेच सोडले. श्रीलंकेच्या कुसल मेंडिसने हैद्राबादमध्ये पाकिस्तानी गोलंदाजाचा नक्षा उतरविताना ६५ चेंडूत शतक ठोकले.
क्रिकेटपटूंनी यंदाच्या विश्वचषकात फटाक्यांच्या या माळा लावल्या आहेत. या चौफेर फटके बाजीमध्ये सौजन्य वगैरे काहीही नव्हते. प्रतिथयश गोलंदाजांचा चक्क फटके ठोकून केलेला अपमान होता. गोलंदाजांना किंचितही दयामाया दाखविण्यात आली नव्हती. मॅक्सवेल, मार्करम, क्लासेन, रोहित शर्मा, कुसलमेंडिस यांच्या ४० चेंडूपासूनच्या ६५ चेंडूतील या मैफीली ऐन विश्वचषक स्पर्धेत रंगल्या. विश्वचषक अर्ध्यावर आलाय. अजून फटाक्यांच्या मोठ्या माळा लावायच्या आहेत, कानठळ्या बसविणारे बॉम्ब फोडले जायचे आहेत. सोबतच नजाकतपूर्ण डावांच्या रंगीत फटक्यांची रोषणाईही व्हायची आहे.
विश्वचषकातील सामने कोण जिंकतो यात यावेळी क्रिकेटरसिकांना फारसा रस नाही. भारतीय संघाची शिखरस्थानापर्यंतची वाटचाल पहायला आसुसलेल्या भारतीय क्रिकेटवेड्यांना वाटचालीतील अन्य देशांच्या खेळाडूंच्या कौशल्याचा आनंद लुटायचा आहे. फलंदाजांच्या भात्यातील कव्हर्स, ड्राईव्हज्, स्वीप, रिव्हर्स स्वीप, स्कूप, हूक आदी फटक्यांची विविधता डोळ्यात साठवायची आहे. विकेट गेली तरी बेहत्तर, रिव्हर्स स्वीपचा फटका मारणारे, ज्यो रूटसारखे धाडसी फलंदाज पहायचे आहेत.
तापाने फणफणलेला ग्लेन मॅक्सवेल हॉलंडविरुद्ध सामन्यात आपल्यावर खेळायची पाळी येऊ नये अशी प्रार्थना करीत पॅव्हेलियनमध्ये बसला होता. त्याची प्रार्थना काही देवाने ऐकली नाही. ३९ व्या षटकात त्याला फलंदाजीसाठी मैदानात उतरावेच लागले. त्याला पहिला चेंडू खेळायला मिळाला ४१ व्या षटकात. त्यानंतर जे मैदानावर घडत होतं ते एखाद्या चित्रपटाच्या ‘प्रोमो’सारखं होतं. एका स्फोटक खेळीची झलक आपण पहात होतो. त्यामध्ये मॅक्सवेलने स्वत: तयार केलेले आगळे वेगळे फटके होते. बॅकवर्ड पॉईन्टच्या डोक्यावरून त्याने मारलेल्या ‘स्लॅशेस’ला काय नाव द्यायचे? ते सर्व फटके स्टॅन्ड्समध्ये विसावत होते. चेंडूचे टप्पे आखूड पडत नसतानादेखील तो मिडविकेटवर फेकून देत होता. स्वीच हिटच्या फटक्यावरचा षटकार शहारे आणणारा होताच पण डे लिडची हॉलंडच्या गोलंदाजाचा यॉर्करवर मारलेला रिव्हर्स स्वीप अचंबित करणारा होता. ऑफ स्टॅम्पवरचा चेंडू स्वीप करून यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हज् जवळून जाताना पाहणे, क्रूरपणा होता. गोलंदाजाचा अपमान होता. ४० चेंडूत मॅक्सवेलने पूरेपूर अपमान केले.
विवियन रिचर्ड्स यांची फलंदाजी पाहताना कधी कंटाळा यायचा नाही. सर डॉन ब्रॅडमन क्रिकेटचा निखळ आनंद देण्यासाठी खेळले. मॅक्सवेलही त्याच जातकुळीचा वाटतो. त्याची फलंदाजी कोणत्याही संदर्भाशिवाय पहायची. कोणाविरुद्ध खेळतो, कोणत्या मैदानावर खेळतो बघायचं नाही. मॅक्सवेलची मैफल कुठेही, कधीही रंगते. आपण फक्त प्रेक्षक बनायचं आणि आनंद लुटायचा. या विश्वचषकात अशा अनेक मैफिली रंगतील. आपण तो खेळाडू कोणत्या देशाचा आहे ते पहायचं नाही. आपल्या रोहित शर्माकडून अशी नजाकत पहायला मिळेल. विराट कोहली तर आता संघाचा मुखिया बनून खेळतोय. बच्चे कंपनी पुढे त्याला आपला आदर्श ठेवायचा आहे असं पुण्यातील शतकानंतर म्हणत होता. ही बच्चे कंपनी म्हणजे, रोहित, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, के एल राहुल, सूर्यकुमार इत्यादी इत्यादी.
दक्षिण आफ्रिकेचे फलंदाजीचे तोफखाने मुंबईत दिल्लीत धडाडत होते. स्फोटत डावांचे ते घाऊक प्रदर्शन होते. ऑस्ट्रेलियाचा बुजूर्ग वॉर्नर यालाही सूर गवसला आहे. न्यूझीलंडचा कॉन्वे आहेच. श्रीलंका, पाकिस्तान यांनाही ओळखीच्या वातावरणात कधी ना कधी सूर गवसेलच. इंग्लंडचे मात्र काही खरे नाही. त्यांचा जोश गेल्या दोन वर्षात संपलेला दिसतोय. “बाझ बॉल” क्रिकेटने सध्यातरी त्यांची पुरती दमछाक झालेली दिसतेय. त्यांना विश्रांतीची गरज आहे. क्रिकेटपासून दूर जायची गरज आहे. मात्र पाकिस्तानविरुद्ध ११ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सामन्यापर्यंत त्यांची सुटका नाही.
मैदानावर मॅक्सवेलसारखे फलंदाज स्फोटक आणि नव्याने तयार केलेल्या फटक्यांची आतषबाजी करीत असताना प्रेक्षक म्हणून आपण सीमारेषेपलिकडे ७५ यार्डापलिकडे असतो. त्या फटक्यांची दाहकता आपल्याला अनुभवता येत नाही. त्यावेळी मैदानावर असणाऱ्या दोन स्थितप्रज्ञ माणसांच्या म्हणजे पंचांच्या नजरेतून अशी चित्तथरारक फलंदाजी कशी दिसत असेल. त्यावेळी मैदानावरील या दोन पंचांची नेमकी मन:स्थिती काय असेल?
या प्रश्नाचे उत्तर मुंबईच्या प्रथमदर्जाच्या क्रिकेटमध्ये प्रदिर्घ काळ पंचगिरी करणारे मारकस कुटो काय म्हणतात ते पहा! मारकस म्हणतात, “अशा अनेक स्फोटक खेळी पंच म्हणून मी पाहिल्या आहेत. एकीकडे नवेनवे फटके पाहण्याची उत्सुकता असतेच; पण दुसरीकडे क्षणार्धात चेंडू आपल्याकडे तर येणार नाही ही भितीही मनात असते. फलंदाजाने फटका मारल्यानंतर चिडलेला गोलंदाज त्यापेक्षाही धोकादायक वाटतो. त्यावेळी त्याचा आपटीबार येणार हे पंच आधीच ओळखून असतात. अशावेळी स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या पंचाला खूण करून दोन पावले मागे उभे राहण्याची किंवा सावध राहण्याची खूण करीत असतात. मात्र काही फूटावरूनच फलंदाजांचा फटके खेळतानाचा पदन्यास पाहता येतो. फलंदाजाने नव्याने शोधलेला एखादा फटका टेलिव्हिजन कॅमेऱ्याच्या आधी नजरेने टिपता येतो. तो आनंद, थ्रील वेगळेच असते. खेळाडूंपेक्षा अधिक काळ मैदानावर असणारे दोन पंच अशा सुंदर फलंदाजींच्या डावाचे निस्सिम चाहते असतात. त्या आनंदावरच त्यांना सामन्यात उभा राहण्याचा कालावधी सुसह्य होत असतो.“ आम्ही पंच अशा महान खेळीचे, फलंदाजीचे, गोलंदाजीचे, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे सर्वात जवळचे साक्षीदार असतो.
यंदाच्या विश्वचषकात अशा सुंदर सुंदर खेळांचे, स्फोटक फलंदाजीचे, भेदक गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे क्षण अनुभवणारे साक्षीदार होऊया!
– विनायक दळवी