केवळ भक्ती मार्गाचा अंगीकार न करता आयुष्यात इतरही रस आहेत त्याची प्रचिती पंडिती काव्यापासून जनमानसाला येत गेली. त्यामुळे महाराष्ट्राच्या मनामनात असलेलं अक्षरवाङ्मय भक्ती मार्गाकडून शाहिरी काव्याकडे वळू लागलं आणि याच शाहिरी वाङ्मयाने महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या मनात भक्ती मार्गासोबतच वीर आणि शृंगार रसाचीदेखील प्रचिती घडवून आणली आणि अवघा महाराष्ट्र अक्षर वाङ्मयातून जीवनामध्ये नवचैतन्याची आणि विचारांची अनुभूती घेत जीवन समजून घेत, जगा आणि जगू द्या असा मंत्रघोष मनामनात करू लागला.
भक्ती साहित्याने, पंडिती काव्याने खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातील जनमानसात मानवतेची ज्योत प्रज्वलित केली ती पुढे सुधारकी वाङ्मयातून अधिक प्रखर झाली. अक्षर वाङ्मय हे काव्यापुरते मर्यादित न राहता अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकात ते गद्यरूपात पुस्तक रूपाने, नियतकालिके आणि मासिकातून महाराष्ट्रातील जनसामान्यांपर्यंत आलेत आणि मग सामाजिक सुधारणेला एक नवा आयाम मिळत गेला.
महानुभाव संप्रदायापासून तर सुधारकी वाङ्मयापर्यंतचा प्रवास बघितला तर आपणास प्रामुख्याने समाजाला पर्यायी अर्थाने मानवी समूहाला, दुसऱ्या अर्थाने मानवी मनाला पोषक करण्याचा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रातील अक्षर वाङ् मयाने केला असून तो प्रवाह आजही निरंतरपणे सुरू आहे. या प्रवाहात आजवर कोणताही खंड पडला नाही. आज आपण ज्या सामाजिक व्यवस्थेत आहोत तो समाज सृजान, सुदृढ आणि सर्व अंगाने विकसित असा आहे. पण या विकसित समाजाची पाळेमुळे मात्र आपल्या भूतकाळात आहेत. हजार वर्षात अक्षरवाङ्मयातून जी निर्मिती झाली त्या निर्मिती प्रेरणेतूनच आजचा समाज उभा झाला आहे. विकसित झाला आहे.
त्यामुळे आपणास आपले गतकाळातील अक्षर वाङ्मय विसरून चालणार नाही किंबहुना आपण विसरू शकत नाही. कारण प्रत्येक भाषेचा विकास हा एकाएकी होत नाही. प्रत्येक भाषेत नवविचारांची निर्मिती ही एकाएकी होत नाही त्यांचे संदर्भ आपण मागील अनेक वर्षात जी वाङ्मय निर्मिती झालेली आहे त्यात शोधावे लागतात. त्यामुळे आज आपण कितीही विकसित झालो तरी आपणास संतांच्या वाङ् मयाचा आणि विचारांचा आधार घ्यावाच लागतो. वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरांपासून तर एकनाथ -तुकारामांपर्यंत आपणास या संतांच्या विचारातील अक्षरधनाची जीवनात क्षणा क्षणाला आठवण करावीच लागते. संत साहित्यातील जीवनमूल्य सांगून जाणारा विचार आपण नाकारून चालत नाही, त्यांचा अंगीकार आजवर अनेक पिढ्यांनी केला आहे.
एक हजार वर्षांपासून ज्या पिढ्या गेल्यात त्या सर्वच पिढ्यांनी मातृभाषेत निर्माण झालेल्या अक्षर वाङ्मयातून आणि विचारातून आपले जीवन सुखमय केले. त्यामुळे समाज विकसित झाला. पोषक झाला. महाराष्ट्रावर भाषेची अनेक आक्रमणे झालीत आणि गेलीत. मराठीसोबतच फारसी, उर्दू, इंग्रजी या भाषा राज्य व्यवहारात आल्यामुळे भाषेचा संकर झाला आणि आपल्या मायबोलीत परकीय भाषेतील शब्द जणू आपलेच शब्द आहेत असे मानून जनसामान्यांनी त्याचा स्वीकार देखील केला.
आजवर आपण याकडे नकारात्मक अंगाने जरी बघत आलो असलो तरीही आपल्या मराठी भाषेची थोरवी अगाध आहे किंवा एक आई म्हणून परकीय भाषेतील शब्दांना देखील आपल्या लेकरांसारखं सामावून घेत आजवर त्या शब्दांचा सांभाळ आपल्या मराठी भाषेने केला, यापेक्षा गौरवाची बाब आपण आपल्या मराठी भाषेविषयी वेगळी काय सांगू शकणार? ज्ञानदेव बोलूनच गेलेत की, माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। या माय मराठीच्या अंगी जेवढे दातृत्व आहे ते कौतुकास्पद आहे आणि याच माय मराठीने आजवर आपली सांस्कृतिक विरासत जतन करून ठेवली आहे.
मागे आणि पुढे बघितल्यावर ती आपणास सहज डोळ्यांपुढे येते. पण आज एवढ्या वर्षानंतर ते देखील प्रगत अशा महाराष्ट्रात असताना मागील काही दशकापासून आपण मराठी भाषेविषयी अनाठायी चिंता करतोय. पण मराठी भाषेला अधिकाधिक व्यावहारिक करण्यासाठी किंवा जनमानसात जी भीती निर्माण झाली आहे ती काढून टाकण्यासाठी ज्या प्रयत्नांची गरज आहे त्याकडे मात्र डोळे झाक करतोय. म्हणजे कळत असूनही करायचं नाही आणि वळू शकतो ते माहीत असूनही वळायचं नाही असा प्रकार मागील काही दशकात झाला. पण असं जरी मागील काही दशकात मराठी भाषिकांचं झालं असलं तरी त्यातून आता आपण बऱ्यापैकी सावरलो आहोत. मराठी सोबतच इतर भाषेसोबत आपलं सलोख्याचं नातं निर्माण झालेलं आहे.
शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा आणि विषय अनिवार्य असायलाच हवा. प्रत्येक विद्याशाखेत मराठी एक विषय असायलाच हवा. महाराष्ट्रातल्या ज्या ज्या विद्यापीठात विज्ञान आणि वाणिज्य शाखेत मराठी विषय आहे ते कौतुकास्पद आहे. मी तर त्या विद्यापीठाचे कौतुकच करतो. पण अन्य विद्यापीठात ते नाही मग त्यांनी देखील इतर विद्यापीठाचा आदर्श अमलात आणायला हवा. शालेय आणि महाविद्यालयीन मग ते कोणत्याही विद्याशाखेतील असो मातृभाषेतील शिक्षण अनिवार्य केले की भाषेची अनाठाई भीती मनात ठेवायची गरज उरत नाही. आज आपल्या महाराष्ट्रात असंख्य मराठी वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, दूरचित्रवाहीन्या आहेत.
घराघरात मराठी कार्यक्रम बघितले जातात. सोबतच मराठी एफएम रेडिओ देखील ऐकले जातात. घराघरात मराठी सोबतच इंग्रजी वृत्तपत्र वाचले जातात त्यामुळे मराठी भाषा मागे पडत आहे किंवा प्रभाव कमी होत आहे असा प्रचार करणे चुकीचे असून मराठीचा प्रभाव आता दिवसेंदिवस वाढत आहे. मराठी भाषा आणि या भाषेतून अधिकाधिक व्यक्त होणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. ज्ञानाचा खरा विकास हा मातृभाषेतूनच होतो हे आता सर्वच पालकांना कळून चुकले आहे.
एका भाषेसोबतच दुसऱ्या भाषेत देखील व्यवहार करता यावा यासाठी इतर भाषेचे ज्ञान जर आवश्यक असेल तर व्यक्ती समूह घेतच आहे पण यामुळे माय मराठीचे महत्त्व कमी झाले आहे आणि त्यासाठी आता प्रयत्न करायला हवेत अशी ओरड ही योग्य नसून ती आपण थांबवायला हवी आणि सचोटीने, सातत्याने मातृभाषेतील पुस्तकांचे आणि वाङ् मयाचे वाचन करावे. साहित्यातील जीवनमूल्ये आत्मसात करावीत ती इतरांना सांगावीत आणि सोबतच विद्यापीठातील ज्या काही अन्य ज्ञानशाखा आहेत त्या ज्ञानशाखेत देखील मराठी वाङ् मय आणि विषय अनिवार्य करावा जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचा मातृभाषासोबतचा संपर्क कमी होणार नाही आणि त्या माध्यमातून आपण चांगले वाचक तयार करू शकू असे म्हणायला देखील हरकत नाही.
डॉ. दिनेश काळे
(मराठी विभाग, संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय, वसई)