कधीतरी पंधरा वीस वर्षापूर्वी कर्माझरीच्या मुख्यद्वारापर्यंत जाऊन जंगल न बघताच परतण्याचा अद्भुत प्रसंग आला होता. अतिशय दूरच्या रस्त्याने गेल्यामुळे वेळेच्या आत प्रवेश मिळाला नाही व प्रवेशद्वारावरच डब्ब्यांवर ताव मारून सारे कुटुंब आल्या पावली परतलो. पण कर्माझरीचे प्रसिद्ध जंगल न बघितल्याची खंत कायमची मनामध्ये कोरली गेली. त्या वेळेस या जंगलात सरकारी रिसॉर्ट धरून केवळ ४/५ रिसॉर्ट असावेत.
अनेक ठिकाणी बाळगोपाळांमध्ये प्रिय असलेल्या “मोगलीची” छायाचित्रे दिसलीत, झाडांवर जंगलात खेळतानाचे मोगलीचे पुतळे बघितलेत. काही नवीनच माहिती त्यावेळेस तेथल्या भित्तिचित्रात बघितली व एक विचित्र कुतूहल मोगली व कर्माझरी बद्दल मनात निर्माण झाले.
जिज्ञासेतून थोडीफार चौकशी केली असता प्राण्यांच्या लाडक्या मोगलीचे कायम वास्तव्य याच पेंचच्या सिवनीपासून सुरू झालेल्या जंगलात असल्याचे कळले. नकळत मोगलीवर चित्रित केलेले गुलजार लिखित “जंगल जंगल बात चली है पता चला है..अरे चड्डी पहेन के फुल खिला है फुल खिला है फुल खिला है” या गाण्यात मन गुंतून गेले. खरे म्हणजे ते एक काल्पनिक पात्रच असल्याचे आतापर्यंत मनात बिंबीत झाले होते. पण सत्यता व कल्पनेतला फरक फारच मोठा असल्याचे वीस वर्षानंतर लक्षात आले.
रिसॉर्टचे मॅनेजर प्रकाशरंजन प्रधान मोगलीचा इतिहास सांगताना तल्लीन होऊन गेलेत. मोगलीचे खऱ्या अर्थाने निर्माते असलेले ‘रुड्यार्ड किपलिंग’ हे स्वतःच्या बालपणात “मोगली” शोधत होते. स्वतःच्या बालपणाचे पात्र “मोगली”च्या नावाने प्रसिद्ध केले अशाही काही गोष्टी त्यांनी अनेक पिढ्यांपासून ऐकलेल्या असल्याचे सांगितले. त्यावेळेस सत्य आणि वास्तवात “मोगली” पूर्णपणे फसल्याचे जाणवले. मध्यप्रदेशातल्या सिवनीपासून संपूर्ण पेचच्या जंगलातच मोगली अनेक प्राण्यांसोबत स्वछंद व मुक्त पणे वावरला असेही जाणकारांकडून कळले.
कर्माझरी…! म्हणजे मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या पेंचच्या ६६० पेक्षा जास्त चौरसकिलोमीटरच्या घनदाट जंगलातला एक प्रचंड मोठा भाग…! या जंगलाचे आकर्षण जगभर आहे..! प्रत्यक्ष अभिताभ बच्चन यांना सुद्धा या जंगलाचा मोह आवरला नाही व त्यांनी ‘सेव टायगर’ या मोहिमेत येथे दोन तीन दिवस मुक्काम केला. “ताज” व “तुली” सारख्या करोडपतींचे येथे सुरेख रेसोर्ट्स आहेत. पण त्याची एका रात्रीची किम्मत बघून सर्वसामान्यांचे डोळेच पांढरे होतात.
“टुरिया” हे पेंच मधल्या कर्माझरीच्या जंगलाला लागून असलेले लहानसे गाव..! तसे पेंच प्रकल्पाला येथे एकूण नऊ/दहा प्रवेशद्वार आहेत. टुरिया, कर्माझरी आणि जामतारा ही प्रवेशद्वारे मध्य प्रदेशात येतात, तर खुर्सापार, सिल्लारी, खुबाळा, चोरबाहुली, कोलीतमारा, साळेघाट व सुरेवानी अधून मधून बंद असतात. पण “टुरिया” हे प्रवेशद्वार अतिशय प्रसिद्ध आहे.
दूरपर्यंत चालत गेल्यावर मधूनच काही प्राण्यांचे दूरवरून अपरिचित आवाज यायचे व अंग शहारून जायचे. याच अपरिचित आवाजामध्ये एके काळी म्हणजे १८९३-९४ला एक आवाज होता मोगलीचा…! याच अद्भुत जंगलात खेळत होता मोगली..! उंच उंच झाडांवर चढून इथल्या सर्वच प्राण्यांसोबत त्याने दंगा मस्ती केली.
नेहमीच लांडग्यांच्या कळपांमध्ये राहत असलेल्या मोगलीने फक्त मनुष्याच्या रूपातच जन्म घेतला होता. बाकी त्याच्या सवयी, खाणे, पिणे, आवडी निवडी, आवाज, ओरडणे, किंचाळणे व वावर हे सारे काही प्राण्यांचाच अस्त्तिवाचा भाग होते. मोगली हा मनुष्याचे रूप धारण केलेला एक “मनुष्य प्राणी” होता हे अनेक संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे, असा अभ्यासकांचा दावा आहे. तो एक “मनुष्य छावा” म्हणजे मानव शावकच होता असेही मानले जाते. इंग्रजांनी त्याला पकडल्यानंतर त्याला मनुष्याच्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही. अंगावरचे कपडे तो फेकून द्यायचा. चार पायांवरच तो चालायचा.
मध्यप्रदेशच्या पेंचमधल्या सिवनीच्या जंगलामधे रुड्यार्ड किपलिंग नावाच्या जन्माने भारतीय असलेल्या एका ब्रिटिश लेखकाला लांडग्यांच्या कळपांमध्ये खेळत असलेल्या मोगलीचे दर्शन झाले. त्या दर्शनाच्या वेळेस बाल मोगली १८९३ मध्ये एका लांडगिणीचे दूध तिच्या कळपात राहून पित होता. हे अद्भुत दृश्य बघून किपलिंग आश्चर्य चकित झालेत.
किपलिंगने मोगलीला पकडण्याचा प्रयत्न केला पण सर्व लांडग्यांनी मिळून त्याचे संरक्षण केले आणि किपलिंगचा डाव हाणून पाडला. लांडगे हेच मोगलीचे आई-वडिल होते व तेच त्याचे जग होते. त्यानंतर १८९५ मध्ये किपलिंगने “जंगल बुक” नावाच्या प्रचंड लोकप्रिय झालेल्या पहिल्याच पुस्तकात बालमोगलीचे जीवन चरित्र साकार केले. सिवनीजवळ असलेल्या कान्हीवाडा नावाच्या गावाजवळ अमोधगढचा किल्ला असून त्यानंतर लागणाऱ्या टेकडीवर मोगली सापडला होता, अशी मान्यता आहे.
कर्माझरीच्या या परिसरात एकूण १२ ते १३ वाघ असून ‘लेपर्ड’ व ‘तेंदुआ’ ते मारून खातात. नुकत्याच झालेल्या व्याघ्र गणनेनुसार ६५ ते ७० वाघ असल्याची माहिती मिळाली. जेमतेम ३०० रुपये पर्यटक समुहाकडून अतिशय कष्टाने प्राप्त करणारे व अत्यंत दयनीय अवस्थेत जगणारे “गाइड” हा जंगलातला अतिशय महत्वाचा घटक पण अत्यंत दुर्लक्षित..!
एकाएकी गाड्यांची लगबग वाढली. सारे पटापट गाडीत बसले. जिप्सी गाड्यांचा वेग एकाएकी वाढला. समोरून एक गाडी क्रॉस झाली आणि ते ओरडले ‘जल्दि जाओ, ‘जल्दि जाओ, शेर बैठा है.. तालाब.. तालाब..! म्हणजे वाघ तलावाशेजारी हजर होता.. काही वेळाने गाडीने वेग कमी केला.. समोर “चायपत्ती” नावच्या ठिकाणी काही गाड्या दिसल्या.. सकाळी साडेनऊच्या आसपास दहा-बारा गाड्या असूनही उत्सूकता पूर्ण शांतता होती.
एक डौलदार व रुबाबदार वाघीण आपले अर्धे शरीर पाणवठ्यात सोडून मस्त पहुडलेली होती. बहुतेक ती स्नानाच्या तयारीत असावी. मग ही टी-६५ नावाची वाघीण उठून येरझार्याा घालायला लागली. काय एखाद्या राणीची चाल होती..! काळे कान, अंगावर लाल-काळे पट्टे, पिवळ्या काळी ‘मिशी’..! आयुष्यातले पहिले व्याघ्र दर्शन जवळपास पंचवीस मिनिटे चालले.! “व्याघ्र दर्शन” ही लाइफ टाइम ‘अचिव्हमेंट’असते हे त्यावेळेस जाणवले. मोगलीच्या जंगलात “व्याघ्र दर्शन” झाले की पैसे वसूल हा भ्रम नसून वास्तविकता आहे हेच अंतिम सत्य आहे.
असे हे मोगलीचे नंदनवन..! वयाच्या तीस-एकतिसाव्या वर्षी मोगलीला टी.बी. झाला व त्यात त्याचा अंत झाला असे म्हटले जाते. तर काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार तो परत जंगलात गेला. नंतरच्या झालेल्या आपसातील भांडणात सारेच लुप्त झालेत अथवा मारले गेलेत.. म्हणुनच मोगली म्हणजे वास्तव की भ्रम हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे, असे वाटायला लागते…!
श्रीकांत पवनीकर
sppshrikant81@gmail.com