राजे चार्ल्स यांचा भूतकाळ हा तारुण्याला साजेसा असला तरी राजघराण्याच्या लौकिकाला फारसा साजेसा नव्हता. विवाहापूर्वी त्यांचे नाव अनेक तरुणींशी जोडले जाणे साहजिक होते. त्या काळी त्यांच्या अनेक तरुणींशी असलेल्या संबंधांची चर्चाही होत होती. पण लेडी डायना यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर या चर्चा थांबल्या होत्या.
लेडी डायना या राजपुत्रवधू म्हणून ब्रिटनवासीयांना खूप आवडल्या होत्या. विवाहानंतर चार्ल्स आणि डायना यांना दोन पुत्र झाल्यामुळे एकंदरच हे जोडपे सुखी असल्याची भावना देशात होती. पण नंतरच्या काळात चार्ल्स यांचे जुने प्रेमप्रकरण भूतकाळाचा पडदा फाडून पुन्हा वर्तमानात डोकावू लागले आणि राजघराण्यातील शांततेला घरघर लागली.
डायनाने त्यांच्या दोघांच्या वैवाहिक जीवनात तिसरी व्यक्ती असल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर चार्ल्स यांच्या लोकप्रियतेला ग्रहण लागले व राजघराण्याची आदब पाळण्यात ते कमी पडत असल्यामुळे त्यांना राजेपदाचे भावी वारसदार मानणे ब्रिटिश जनतेला अवघड जाऊ लागले.
चार्ल्स यांचे जुने प्रेमप्रकरण उघडपणे पुन्हा सुरू झाल्यानंतर डायना व त्यांचा घटस्फोट झाला आणि राजघराण्याच्या परंपरेला एक मोठा धक्का बसला. त्यानंतर डायना यांची चार्ल्सचे खरे स्वरूप उघड करणारी दूरचित्रवाणीवरची मुलाखत आणि त्यानंतर झालेला अपघाती मृत्यू यामुळे चार्ल्स यांची लोकांच्या मनात असलेली प्रतिमा पूर्णपणे काळवंडली होती.
युवराज चार्ल्स यांचे कॅमिला पार्कर बोल्स यांच्याशी विवाहाच्या आधीपासून प्रेमप्रकरण होते. पण चार्ल्स हे आपल्या लष्करी प्रशिक्षणासाठी निघून गेल्यानंतर कॅमिला यांनी एका लष्करी अधिकाऱ्याशी विवाह केला.
चार्ल्स व कॅमिला हे दोघेही आपापल्या संसारात फारसे रमले नाहीत व त्यांचा परस्पर संपर्क चालू राहिला. त्यामुळे दोघांचेही विवाह पुढे तुटले व दोघेही पुढे काही काळ घटस्फोटित आयुष्य जगत होते. डायना यांच्या निधनानंतर कॅमिला व चार्ल्स यांनी विवाह केला, पण हा विवाह स्वीकारण्यास ब्रिटिश जनतेला खूप वेळ लागला.
कॅमिला या ब्रिटिश जनतेच्या दृष्टीने दीर्घकाळ खलनायिकाच होत्या. या विवाहामुळे चार्ल्स यांची लोकप्रियता इतकी घटली की, राणी एलिझाबेथ यांच्यानंतर चार्ल्स यांना राजा करण्याऐेवजी चार्ल्स यांचे पहिले पुत्र विल्यम यांनाच राजा करावे अशी दबत्या आवाजात मागणी होऊ लागली.
विशेषत: डायना यांच्या अंत्ययात्रेत १५ वर्षे वयाच्या विल्यम यांनी जो समजदारपणा दाखवला होता, त्यामुळे ब्रिटिश जनता त्यांच्यावर फिदा झाली होती. नंतरही विल्यम यांनी तारुण्यात वडिलांप्रमाणे प्रेमप्रकरणे न करता थेट कॅथरीन मिडलटन या कोणत्याही राजघराण्याशी संबंधित नसलेल्या तरुणीशी प्रेमविवाह केला. विल्यम हे आता राजपुत्र आहेत व त्यांना प्रिन्स ऑफ वेल्स ही उपाधी प्रदान करण्यात आली आहे, त्यामुळे कॅथरीन या आपोआपच प्रिन्सेस ऑफ वेल्स झाल्या आहेत.
राजे चार्ल्स यांनी कॅमिला यांच्याशी विवाह केल्यानंतर मात्र आपल्या वर्तनात बऱ्याच सुधारणा केल्या तसेच कॅमिला यांनीही राजघराण्याच्या लौकिकाला बाधा येईल असे कोणतेही वर्तन केले नाही. त्यामुळे राणी एलिझाबेथ यांनी चार्ल्स हे राजे झाल्यानंतर कॅमिला या राणी ही उपाधी लावू शकतील असे जाहीर केले. त्यानुसार आता चार्ल्स हे राजे तर कॅमिला या राणी झाल्या आहेत.
राणी एलिझाबेथ यांनी देशाच्या कसोटीच्या काळात ब्रिटिश संविधानाच्या रक्षक म्हणून आपली भूमिका अत्यंत समर्थपणे पार पाडली होती. त्यांच्या ७० वर्षांच्या कारकीर्दीत ब्रिटनचे १५ पंतप्रधान झाले होते. त्या २६ व्या वर्षी राणी झाल्या तेव्हा ८० वर्षांचे विन्स्टन चर्चिल हे पंतप्रधान होते.
दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनला विजय मिळवून देणारे ते पंतप्रधान असल्यामुळे त्यांचा मोठा दबदबा होता. पण त्यांच्या नातीच्या वयाच्या राणीने त्यांच्या मोठेपणाला मान दिला तरी त्याचे ओझे कधीच बाळगले नाही.
अर्थात चर्चिल हे स्वत:ला राजघराण्याचे निष्ठावंत सेवक मानीत असत, त्यामुळे त्यांनीही आपल्या मोठेपणाचे ओझे राणींवर कधी लादले नाही. पण आता ब्रिटनमधील परिस्थिती बरीच बदलली आहे. काही लोक गेल्या काही वर्षांपासून राजघराण्याचे लोकशाही देशात प्रयोजनच काय असा सवाल करू लागले आहेत.
विशेषत: राजघराण्यातील काही लोक बेजबाबदारपणे वागू लागले की लोक राजघराण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत. अलीकडेच राजे चार्ल्स यांचे दुसरे पुत्र हॅरी यानी मेगन मार्केल या अमेरिकन मिश्रवर्णी अभिनेत्रीशी विवाह केल्यावर बऱ्याच भुवया उंचावल्या गेल्या होत्या. त्यातच मेगन यांनी राजघराण्यात राहण्यास अथवा राजघराण्याच्या परंपरांचे ओझे बाळगण्यास नकार दिल्यानंतर राजघराण्यात संघर्ष निर्माण झाला होता.
हॅरी व मेगन यांचा मुलगा श्वेतवर्णी नसल्यामुळे त्याला शाही बिरुदावलीही नाकारण्यात आल्याची चर्चा होती. त्याबद्दल राणीला दोषी धरण्यात येत होते. पण राणीच्या निधनानंतरच्या भाषणात राजे चार्ल्स यांनी हॅरी व मेगन हे राजघराण्याचेच सदस्य असल्याचे सुचित केले तसेच राणीच्या संपूर्ण अंत्यविधीच्या प्रक्रियेत हॅरी व मेगन यांनी ठळकपणे भाग घेतल्यामुळे आता या वादावर राजे चार्ल्स यांनी पडदा टाकून आपल्या राजकौशल्याचे प्रदर्शन केले आहे.
राजे चार्ल्स यांनी हॅरी व मेगन यांच्या अपत्यांना म्हणजेच आपल्या नातवांना शाही बिरुदावल्या बहाल करण्याचेही ठरवले असल्याच्या बातम्या आहेत. याचा अर्थ हॅरी व मेगन हे यापुढच्या काळात राजघराण्याचा भाग असतील असे दिसते.
राजघराण्याच्या वारसांनीच शाही खानदानाच्या किल्ल्याला भगदाड पाडल्यामुळे राजघराण्याच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. पण आता राजे चार्ल्स यांनी आपल्या कर्तृत्वाने हे प्रश्नचिन्ह दूर केले तर हे विन्डसर राजघराणे दीर्घकाळ ब्रिटनची राजेशाही चालवू शकेल.
दिवाकर देशपांडे
diwakardeshpande@gmail.com