अदानी समूहाचा मोठा करार, ही कंपनी विकत घेण्याची घोषणा; खुली ऑफरही जाहीर!
गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह रिलायन्स पॉवरचा वीजनिर्मिती प्लांट खरेदी करणार आहे. अदानी समूह हा प्लांट खरेदी करण्यासाठी तब्बल 2,400 ते 3000 कोटी रुपयांचा करार करणार असल्याचे समोर आले आहे. रिलायन्सचा हा बंद असलेला प्लांट खरेदी करण्यासाठी अदानी पॉवरची सध्या सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीशी बोलणी सुरु आहे. त्यामुळे आता हा करार झाल्यास, या प्रकल्पाला नवसंजीवनी मिळणार आहे.
600 मेगावॅटची आहे क्षमता
अदानी समुहाच्या अदानी पॉवरला नागपुरातील 600 मेगावॅटचा बुटीबोरी औष्णिक ऊर्जा प्रकल्प विकत घ्यायचा आहे. या उर्जा प्रकल्पाचे नियंत्रण पूर्वी अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरकडे होते. अदानी समूह या प्लांटसाठी प्रति मेगावॉट 4 ते 5 कोटी रुपये देण्यास तयार आहे. या प्रकल्पात दोन पॉवर प्लांट युनिट आहेत. यापूर्वी या प्रकल्पाचे मूल्यांकन 6000 कोटी रुपये इतके होते. मात्र, हा प्रकल्प बंद झाल्यानंतर, त्यांचे मूल्य निम्म्यावर आले आहे. हा प्लांट अदानी समूहाच्या धोरणात परफेक्ट बसतो.
जेएसडब्ल्यू एनर्जीचीही खरेदीसाठी चाचपणी
नागपुरच्या बुटीबोरी परिसरातील हा थर्मल पॉवर प्रकल्प रिलायन्स पॉवरची उपकंपनी असलेल्या विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरद्वारे चालवला जातो. रिलायन्स पॉवर आर्थिक संकटात सापडल्यानंतर हा प्रकल्पही बंद झाला. याआधी सज्जन जिंदाल यांची कंपनी जेएसडब्ल्यू एनर्जीनेही हा प्रकल्प खरेदी करण्यात रस दाखवला होता. परंतु, उच्च मूल्यांकन आणि ऑपरेशनल समस्यांमुळे त्यांनी हा व्यवहार केला नाही.
प्रकल्पाला मिळणार नवसंजीवनी
यापूर्वी रिलायन्स पॉवरने मुंबईतील वीज पुरवठ्यासाठी बुटीबोरी प्लांटचा वापर केला होता. पण त्यानंतर अदानी इलेक्ट्रिसिटीने मुंबईच्या वीज वितरण व्यवसाय आपल्याकडे घेत, त्यावर सध्या चांगली पकड निर्माण केली आहे. डिसेंबर 2019 मध्ये विदर्भ इंडस्ट्रीज आणि अदानी यांच्यातील वीज खरेदी कराराची मुदतही संपली. यानंतर बुटीबोरी प्रकल्प आर्थिक संकटात सापडला. कर्जदारांनी कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची याचिका दाखल केली. परंतु, सध्या दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. अदानी समूह हा प्रकल्प विकत घेऊन, नागपूरजवळ असलेल्या तिरोडा पॉवर प्लांटशी जोडेल. त्यामुळे आता लवकरच या प्रकल्पाला नवसंजीवनी मिळणार आहे.