अंबानी-अदानी IPL मध्ये आमने-सामने भिडणार; अदानी समूह 'या' टीमचा सर्वाधिक हिस्सा करणार खरेदी!
अंबानी आणि अदानी समूह हे देशातील प्रमुख उद्योग समूह आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही समूहांची नेहमीच चर्चा होत असते. मात्र, आता मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे दोघेही एकमेकांसोबत भिडणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या दोघांमध्ये नेमकी असे काय होणार आहे. ज्यात हे दोघेही आमने-सामने येणार आहेत.
‘या’ संघाचा मोठा हिस्सा खरेदी करणार
मिळालेल्या माहितीनुसार, अदानी समूहाने आयपीएलमधील गुजरात टायटन्स संघाचा हिस्सा खरेदी करणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स टीमच्या मालकीसह अंबानी समूह आधीच आयपीएलमध्ये आहे. तर आता गुजरात टायटन्सचा हिस्सा खरेदी करार पूर्ण झाल्यास, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यात थेट सामना होणार आहे.
कधीपर्यंत होईल करार?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नवीन IPL संघांना फेब्रुवारी 2025 पर्यंत त्यांचे स्टेक विकण्यास मनाई केली आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2025 मध्ये बंदी उठल्यानंतर हा करार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तीन वर्षे जुन्या गुजरात टायटन्स फ्रँचायझीचे मूल्य 1 अब्ज ते 1.5 बिलियन डॉलर दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. 2021 मध्ये सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्सने ही फ्रँचायझी 5,625 कोटी (745 दशलक्ष डॉलर) मध्ये खरेदी केली होती.
2021 मध्ये गुजरात टायटन्स संघ खरेदी करण्याची संधी गमावल्यानंतर, अदानी आणि टोरेंट समूह गुजरात टायटन्समधील मोठा हिस्सा खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, नफा कमावल्यानंतर सीव्हीसीलाही आपला हिस्सा विकायचा आहे. मात्र, या तिघांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, सीव्हीसी ही क्रीडा क्षेत्रात गुंतवणूक करणारी मोठी कंपनी आहे.
गुजरात टायटन्स-नीता अंबानी ‘शत्रू’?
आयपीएलमध्ये प्रवेश केल्यानंतर गुजरात टायटन्सने संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवले होते. याआधी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने पहिल्याच सत्रात विजेतेपद पटकावले होते. यानंतर नीता अंबानी यांच्या मालकीच्या मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्समधून हार्दिक पांड्याला परत बोलावून, मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोपवले. आता तोच संघ विकत घेण्याच्या शर्यतीत अदानी ग्रुप सामील झाला आहे.






