एशियन पेंट्सचा शेअर 9.50 टक्क्यांनी घसरला, 2020 नंतर स्टॉकने पहिल्यांदा गाठली निच्चांकी पातळी!
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरुच आहे. असे असतानाही काही शेअर हे जोरदार कामगिरी करत आहे. तर काही शेअर हे धाराशाही झाल्याचे पाहायला मिळत आहे. यात एशियन पेंन्टस या रंग निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी (ता.११) शेअर बाजार उघडताच एशियन पेंट्सचे शेअर 9.47 टक्क्यांनी घसरून, 2505 रुपयांवर आला. विशेष म्हणजे 2020 नंतर प्रथमच एशियन पेंट्सचा स्टॉक या पातळीवर व्यवहार करत आहे.
तिमाही निकालही अपेक्षेपेक्षा खराब
दरम्यान, आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत एशियन पेंट्सचे तिमाही निकाल शेअर बाजारातील अपेक्षेपेक्षा खराब आहेत. दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात 5.3 टक्क्यांनी घट झाली आहे. ग्राहकांचा कमी ओढा, पावसाळ्यात सतत पडणारा पाऊस आणि पूर यांमुळे एशियन पेंट्सच्या विक्रीत घट झाली आहे. मात्र, पेंट्स क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचे दिसते. या क्षेत्रात बिर्ला ओपस आणि जेएसडब्ल्यू पेंट्सच्या प्रवेशानंतर पेंट्स उद्योगातील स्पर्धा वाढली आहे.
(फोटो सौजन्य – iStock)
हे देखील वाचा – टाटांच्या ‘या’ कंपनीची कमाल, 5 दिवसात छापले 57 हजार कोटी रुपये; वाचा… सविस्तर!
जेफरीजने स्टॉकवरील लक्ष्य किंमतही कमी
एशियन पेंन्टस या रंग निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या निराशाजनक त्रैमासिक निकालानंतर, ब्रोकरेज हाऊसेसने स्टॉकवरील त्यांच्या लक्ष्य किमती कमी केल्या आहेत. नोमुरा इंडियाने स्टॉकवर तटस्थ राहून आपली लक्ष्य किंमत 2850 रुपयांवरून, 2500 रुपयांपर्यंत कमी केली आहे. जेफरीजने स्टॉकवरील लक्ष्य किंमतही 2100 रुपये केली आहे.
स्टॉकमध्ये आणखी घसरणीची शक्यता
अर्थात ब्रोकरेज हाऊस स्टॉकमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करतात. जेपी मॉर्गनने स्टॉकची किंमत कमी ठेवली आहे. त्यांनी लक्ष्य किंमत 2400 रुपये कमी केली आहे. मॉर्गन स्टॅनलीने 2522 रुपयांचे टार्गेट दिले आहे. ज्याच्या आसपास शेअरचा व्यवहार होत आहे. सीएलएसएच्या मते, स्टॉक कमी कामगिरी करेल आणि ब्रोकरेज हाऊसने 2290 रुपयांचे लक्ष्य दिले आहे.
निराशाजनक परिणाम
एशियन पेंट्सचा महसूल दुसऱ्या तिमाहीत 5.3 टक्क्यांनी घसरून, 8003 कोटी रुपयांवर आला आहे. तर कंपनीचा निव्वळ नफा 42.2 टक्क्यांनी घसरून, 694.64 कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीच्या निराशाजनक निकालांबद्दल, सीईओ अमित सिंगल म्हणाले आहे की, गेल्या वर्षी किमती कमी करण्याचा निर्णय, उच्च सामग्रीच्या किमती आणि वाढलेला विक्री खर्च यामुळे ऑपरेटिंग मार्जिनवर परिणाम झाला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)