Tata Group TCS Huge Profit 57 thousand crore rupees earned in 5 days
शेअर बाजारात गेल्या आठवड्यात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकाला मोठा फटका बसला. या पाच व्यापारी सत्रात सेन्सेक्समधील 10 कंपन्यामधील 6 कंपन्यांना मोठा तोटा झाला. त्यांचे एकूण 1.55 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. तर चार कंपन्यांनी मोठी कमाई केली आहे. त्यांनी बाजारातून ताबडतोब कमाई करून दिली. टाटा समूहाची कंपनी टीसीएसने तर कमाल केली. पाच दिवसांतील व्यापारी सत्रात टीसीएसच्या गुंतवणूकदारांनी 57 हजार कोटी रुपये कमावले आहे.
सेन्सेक्सची जोरदार आपटी
चालू आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स 4813 अंकांनी आपटला. 30 सप्टेंबर रोजी सेन्सेक्स 84,200 अंकावर होता. तो घसरून 8 नोव्हेंबर रोजी 79,486 अंकावर उतरला आहे. दलाल स्ट्रीटवर कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालाचा परिणाम दिसून आला आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एचयुएल आणि एलआयसीच्या बाजारातील मूल्यात घसरण दिसली. तर चार कंपन्याना मोठा फायदा झाला आहे. त्यात टीसीएससह एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि एसबीआयचा समावेश आहे.
मुकेश अंबानी यांना मोठा झटका
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला सर्वात मोठा फटका बसला आहे. रिलायन्सचे मार्केट कॅप 74,563.37 कोटी रुपयांहून घसरून 17,37,556.68 कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. याशिवाय भारती ए्अरटेल मार्केट कॅप 26,274.75 कोटी रुपयांनी घसरले आहे. ते 8,94,024.60 कोटींपर्यंत खाली आले आहे. आयसीआयसीआय बँकेच्या गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागले आहे.
बँकेचे मार्केट कॅप 22,254.79 कोटींनी कमी होऊन 8,88,432.06 कोटींवर आले आहे. आयटीसीला 15,449.47 कोटींचा तोटा झाला आहे. तर कंपनीचे बाजारातील मूल्य कमी होऊन 5,98,213.49 कोटी रुपयांवर आले आहे. एलआयसीचे बाजारातील मूल्य 9,930.25 कोटी रुपयांनी कमी झाले. ते आता 5,78,579.16 कोटी रुपयांवर आले आहे. तर एचयुएल मार्केट कॅप 7,248.49 कोटींनी घसरून 5,89,160.01 कोटी रुपये इतके झाले आहे.
टीसीएसची जोरदार कमाई
तर दुसरीकडे टीसीएस कंपनीचे बाजारातील मूल्य वाढून ते 14,99,697.28 कोटी रुपये इतके झाले आहे. पाच व्यापारी सत्रातच गुंतवणूकदारांनी 57,744.68 कोटी रुपये छापले आहे. तर दुसरी दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसचे बाजारातील मूल्य 28,838.95 कोटींनी उसळले ते वाढून 7,60,281.13 कोटी रुपयांवर पोहचले आहे. तर एसबीआयच्या नफ्यात 19,812.65 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बँकेचे मार्केट कॅप 7,52,568.58 रुपयांवर पोहचले आहे. तर एचडीएफसी बँकेचे बाजारातील मूल्य 14,678.09 कोटी रुपयांनी वाढून, 13,40,754.74 कोटी रुपये झाले.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)