18 लाखांहून अधिक सदस्य ईपीएफओमध्ये सामील; नवीन सदस्यांच्या संख्येतही वाढ!
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये 18.53 लाख सदस्य जोडले आहेत. त्यात वार्षिक आधारावर 9.07 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. याशिवाय 9.3 लाख नवीन सदस्य देखील ईपीएफओमध्ये सामील झाले आहेत. ऑगस्ट 2023 च्या तुलनेत हा आकडा 0.48 टक्क्यांनी वाढला आहे. या आकडेवारीवरून दिसून येत आहे की, लोकांमध्ये ईपीएफओबाबत केवळ जागरुकता वाढली नाही तर देशातील रोजगारही सातत्याने वाढ होत आहे.
नवीन सदस्यांपैकी बहुतांश 18 ते 25 वयोगटातील
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वेतन आकडेवारीनुसार, बहुतेक नवीन सदस्य हे 18 ते 25 वर्षे वयोगटातील आहेत. ऑगस्टमध्ये जोडलेल्या एकूण नवीन सदस्यांपैकी या वयोगटातील सदस्यांची संख्या 59.26 टक्के इतकी आहे. त्यापैकी बहुतेकांना पहिल्यांदाच नोकऱ्या मिळाल्या आहेत. ऑगस्टमध्ये सामील झालेल्या एकूण 18.53 लाख सदस्यांपैकी 18 ते 25 वर्षे वयोगटातील सदस्यांची संख्या 8.06 लाख इतकी आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – मुंबईत 10-15 लाख कमावणाराही गरीब, नोकरदारांच्या पगाराचे पैसे कोण खातंय… तरी कोण?
13.54 लाख सदस्यांचा ईपीएफओमध्ये पुन्हा प्रवेश
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पेरोल आकडेवारीनुसार, 13.54 लाख सदस्यांनी ईपीएफओ सोडल्यानंतर पुन्हा प्रवेश केला आहे. ऑगस्ट 2023 च्या तुलनेत हा आकडा 14.03 टक्क्यांनी वाढला आहे. या लोकांनी एक नोकरी सोडून दुसरी जॉईन केली आहे. अंतिम तोडगा काढण्याऐवजी त्यांनी त्यांचे ईपीएफओ खाते हस्तांतरित केले आहे. यामुळे तो ईपीएफओच्या सामाजिक सुरक्षा योजनांच्या कक्षेत राहतो.
महिलांचा कर्मचाऱ्यांचा वाढतोय सहभाग
ईपीएफओच्या आकडेवारीनुसार सुमारे २.५३ लाख नवीन सदस्य महिला आहेत. ऑगस्ट 2023 च्या तुलनेत हा आकडा 3.75 टक्क्यांनी वाढला आहे. ऑगस्टमध्ये सामील झालेल्या एकूण सदस्यांपैकी महिलांची संख्या ३.७९ लाख इतकी आहे. ऑगस्ट 2023 च्या तुलनेत हा आकडा 10.41 टक्क्यांनी वाढला आहे. महिलांचा कर्मचाऱ्यांचा वाढता सहभाग हे देखील चांगले लक्षण आहे.






