असे न केल्यास ...यावर्षी येणार आर्थिक मंदी; तज्ञांचा अमेरिकेच्या सेंट्रल बॅंकेला इशारा!
जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेसमोर आता पुन्हा एकदा मंदीचे काळे ढग दाटून आले आहे. अलिकडेच रोजगाराची चिंताजनक आकडेवारी समोर आली. ज्यामुळे जागतिक बाजाराला चांगलेच हिंदोळे बसले. अशातच आता तज्ञांनी देखील मंदीच्या धोक्याबाबत आगाऊ सुचना जारी केली आहे. या सुचनेमध्ये तज्ञांनी म्हटले आहे की, अमेरीकी सेंट्रल बॅंकेला तात्काळ व्याजदरात कपातीचा निर्णय घेणे, गरजेचे आहे.
काय म्हटलंय तज्ञांनी आपल्या सुचनेमध्ये?
इन्वेस्टमेंट मॅनेजमेंट फर्म deVere Group चे मुख्य कार्यकारी अधिकारी निगेल ग्रीन यांनी म्हटले आहे की, अमेरिकेला येऊ घातलेल्या आर्थिक मंदीच्या संकटात सापडायचे नसेल, तर अमेरिकेच्या सेंट्रल बँकेला व्याजदर कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. एका नामांकित वृत्तसमुहाने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह पुढील सप्टेंबर महिन्यात आपल्या व्याजदरात 50 बेस पॉईंट म्हणजेच 0.50 टक्क्यांची मोठी कपात केली नाही तर मंदीचा धोका हा आणखी वाढणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.
(फोटो सौजन्य : istock)
फेड़रल रिझर्व्हवर व्याजदर कपातीचे प्रेशर
तज्ञांनी ही चेतावणी अशावेळी समोर आली आहे, जेव्हा आर्थिक बाबतीत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता अमेरीकेच्या सेंट्रल बॅंकेवर व्याज दरात कपात करण्याचे प्रेशर वाढणार आहे.
हेही वाचा : सचिन तेंडुलकर बनणार बिझनेसमन; …सुरु करतोय स्वतःचा स्पोर्ट्स ब्रँड!
मागील २३ वर्षाच्या उच्चांकी पातळीवर आहेत व्याजदर?
गेल्या दोन दशकांपासून अमेरिकेतील व्याजदर हे सर्वोच्च पातळीवर आहेत. जुलैमध्ये झालेल्या फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीत फेडरल रिझर्व्हने सलग आठव्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. दरम्यान फेडरलचे बेंचमार्क व्याज दर सध्या 5.25-5.50 टक्के पातळीवर आहेत. विशेष म्हणजे गेल्या 23 वर्षांतील व्याजदराची ही सर्वोच्च पातळी आहे.
जेरोम पॉवेल यांनी दिले आहेत हे संकेत
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने यावर्षीच्या शेवटीपर्यंत व्याजदरात कपात करण्याचा इशारा दिला आहे. फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी म्हटले होते की, येत्या काळात महागाईचा दबाव कमी झाल्यास फेडरल बँक व्याजदर कमी करू शकते. यूएस फेडरल बँकेची पुढील फेडरल ओपन मार्केट कमिटीची बैठक सप्टेंबर महिन्यात होणार आहे. सप्टेंबरच्या बैठकीत व्याजदर कमी झाल्यास 4 वर्षांतील अमेरिकेतील ही पहिलीच व्याजदर कपात असणार आहे.