नोकरी सोडली, कोरफड शेती फुलवली; साताऱ्याचा तरुण शेतकरी करतोय 3.5 कोटींची उलाढाल!
सध्याच्या घडीला अनेक सुशिक्षित तरुण शेतीमध्ये पाऊल ठेवत आहे. विशेष म्हणजे आपल्या ज्ञान आणि कष्टाच्या जोरावर ते मोठ्या प्रमाणात उत्पन्न देखील मिळवत आहेत. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने नोकरीला रामराम ठोकत, कोरफडीच्या शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे. त्याने आपल्या शेतात कोरफड लागवड करत, तब्बल साडेतीन कोटींची उलाढाल केली आहे.
नोकरीला ठोकला रामराम
ह्रषिकेश ढाणे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, तो सातारा जिल्ह्यातील पाडळी येथील रहिवासी आहे. त्याने २० व्या वर्षी ऋषिकेशने एका मार्केटिंग कंपनीत नोकरी केली. मात्र, नोकरीत मन रमत नसल्याने, त्याने शेतीमध्ये काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक पिकांऐवजी शेतीमध्ये काहीतरी नवीन पीक घेत, त्यातून अधिक अर्थार्जन करण्यासाठी तो नाविन्यपूर्ण पिकाची माहिती घेत होता.
हेही वाचा : बांगलादेशातील पेचप्रसंगाचा संत्रा उत्पादकांना फटका; शेतकऱ्यांसह निर्यातदार चिंतेत!
फसवणुकीतूनच शोधली संधी
अशातच त्याला ‘कोरफड वाढवा, लाखो कमवा’ या घोषणेबद्दल समजले. मात्र, या घोषणेच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याने अनेक शेतकऱ्यांना फसवले होते. तो व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतातील कोरफड खरेदी करण्यासाठी आलाच नाही. ज्यामुळे या शेतकऱ्यांनी कोरफड शेतात तशीच सोडून दिली. ऋषिकेशने या शेतकऱ्यांनी टाकून दिलेल्या कोरफडीची रोपे आणून स्वत:च्या शेतात लावली.
कोरफड उत्पादनाचे व्यवसायात रुपांतर
२००७ मध्ये त्याने आपल्या शेतीमध्ये ही ४००० कोरफडीची रोपे लावली. त्यापासून त्याने हळूहळू साबण, शॅम्पू, ज्यूस अशी विविध उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली.२०१३ पर्यंत त्याने कोरफड उत्पादनाचे व्यवसायात रुपांतर करण्यास सुरुवात केली. आणि आता त्याची कमाई पाहून गावातील तेच शेतकरी कोरफड लागवडीची प्रेरणा घेत आहेत. ज्यांनी व्यापारी न मिळाल्याने आपल्या शेतात कोरफड सोडून दिली होती.
हेही वाचा : पेट्रोलनंतर डिझेलमध्येही होणार इथेनॉलचा वापर; ऊस, मका उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा!
कमावतोय वर्षाला ३.५ कोटी
ह्रषिकेश ढाणे आपल्या शेतामध्ये उत्पादित कोरफडीपासून सरासरी ८ हजार लिटर उत्पादने बनवतो. या उत्पादनांच्या विक्रीतून ३० टक्के नफा मिळवत , तो सध्या वार्षिक ३.५ कोटी रुपयांच्या टर्नओव्हर करत आहे. आंतराष्ट्रीय मागणीमुळे तसेच देशांतर्गत कोरफडीच्या अनेक पदार्थांची मागणी होत असताना त्याला मोठा आर्थिक फायदा झाला आहे.