भारतीयांसाठी आनंदाची बातमी..! विदेशी गुंतवणूकीचा ओढा वाढला, आतापर्यंत झालीये इतकी गुंतवणूक!
विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारावरील विश्वास कायम असून, विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारात सातत्याने गुंतवणूक करत आहे. याचा अंदाज गेल्या जुलै महिन्यात भारतीय बाजारात विदेशी गुंतवणुकीतून पाहायला मिळत आहे. चालू जुलै महिन्यात भारतीय बाजारात आतापर्यंत एकूण 33,600 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. यापूर्वीच्या जून महिन्यात देखील विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. तर लोकसभा निवडणूक निकाल हाती येण्याच्या आधी बाजार विदेशी गुंतवणूकदारांनी ओस पडलेला पाहायला मिळाला होता.
अर्थसंकल्पामुळे गुंतवणूक काढून घेतली
उपलब्ध माहितीनुसार, 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, हा अर्थसंकल्प परकीय गुंतवणूकदारांच्या दृष्टीने नकारात्मक राहिल्याचे सांगितले जात आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडवर कर वाढवणे आणि इक्विटी गुंतवणुकीतून भांडवली नफा यासारख्या काही घोषणा केल्या होत्या. ज्याचा थेट परिणाम, हा भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २४ जुलै ते २६ जुलै या कालावधीत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल ७,२०० कोटींहून अधिक रक्कम काढून घेतली आहे.
(फोटो सौजन्य : istock)
हेही वाचा : टाटा समूहाने करून दाखवलं; गाठला 400 अब्ज डॉलरचा पल्ला; ठरला पहिलाच समूह!
बाँड मार्केटमध्येही झाली गुंतवणूक
शेअर बाजाराची आकडेवारी पाहता विदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात शेअर्समध्ये त्यांची गुंतवणूक वाढवली. असे असतानाच त्यांनी कर्ज किंवा बाँड मार्केटमध्येही भरपूर गुंतवणूक केली आहे. 26 जुलैपर्यंत बाँड मार्केटमध्येही 19,223 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. त्यामुळे आता भारतीय बाँड मार्केटमधील विदेशी गुंतवणूक 2024 मध्ये आतापर्यंत 87,847 कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे.