चालू आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी अवघ्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये भारतीय बाजारातून 32,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्यामुळे सेन्सेक्स 3,300 अंकांनी घसरला आहे. विदेशी गुंतवणूकदार चीनच्या बाजारपेठेकडे वळत आहेत. कारण त्यांना स्वस्त दरात शेअर्स मिळत आहेत. चीन सरकारने नुकतेच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले होते. त्यामुळे चीन आणि हाँगकाँगच्या शेअर बाजारात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, असे असले तरी देशांतर्गत गुंतवणूकदारांनी नोटांनी भरलेल्या पिशव्या घेऊन, बाजारात योग्य वेळी गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे.
एफआयआय, डीआयआय यांच्यात तुल्यबळ स्पर्धा
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे डॉ. विजयकुमार म्हणाले की, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफआयआय) आणि देशांतर्गत संस्था गुंतवणूकदार (डीआयआय) यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे नजीकच्या भविष्यात बाजाराच्या दिशेवर परिणाम होईल. वास्तविकता अशी आहे की, डीआयआयकडे एफआयआयपेक्षा जास्त पैसा आहे आणि ते गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. गुरुवारी (ता.४) एफआयआय आणि डीआयआय यांच्यात तुल्यबळ स्पर्धा पाहायला मिळाली. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफआयआय) 15,243 कोटी रुपयांची विक्रमी विक्री केली. तर देशांतर्गत संस्थांनी 12,914 कोटी रुपयांची विक्रमी खरेदी केली आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – सर्वसामान्यांना झटका… पावसाळा संपताच सिमेंटच्या दरात वाढ, घर बांधणीचा खर्च वाढणार!
गुंतवणूकदारांनी काय करावे?
हाँगकाँगमधील गवेकल रिसर्चचे टॉम मिलर म्हणाले की, देशांतर्गत किरकोळ गुंतवणूकदार नुकतेच इक्विटीमध्ये सामील झाले आहेत. भारतीय कुटुंबांची सुमारे 5 टक्के संपत्ती इक्विटीमध्ये आहे. तर एक तृतीयांश बँकांमध्ये जमा आहे. भारताचा मध्यमवर्ग जसजसा वाढत जातो. तसतसे लाखो लोक चांगल्या परताव्याच्या शोधात शेअर बाजारात प्रवेश करत आहेत. बरेच लोक एसआयपी वापरतील. देशांतर्गत म्युच्युअल फंड रोखीच्या ढिगाऱ्यावर बसले आहेत. व्यवस्थापनाखालील त्यांची मालमत्ता वार्षिक 40 टक्के दराने वाढत आहे.
इराण-इस्रायलमधील तणावाचा परिणाम होणार
चीनच्या प्रोत्साहनानंतर एफआयआयने इतर उदयोन्मुख बाजारपेठांमधून पैसे काढून चीनमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, इराणने इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याने, दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता बळावली आहे. कोटक म्युच्युअल फंडाचे नीलेश शहा यांनी गुंतवणूकदारांना गती देण्याऐवजी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले आहे की, शेअर्समध्ये कमाई करणे हे सर्व काही आहे. मायक्रोकॅप, मिनीकॅप, स्मॉलकॅप ते लार्जकॅप आणि लार्ज मिडकॅपमध्ये सेक्टर रोटेशन असणार आहे. असेही त्यांंनी म्हटले आहे.