'ही' सरकारी कंपनी सापडलीये आर्थिक अडचणीत; वाचा... कितीये कर्जाचा डोंगर!
देशातील आघाडीची सरकारी दूरसंचार कंपनी एमटीएनएल आर्थिक अडचणीत सापडली आहे. एमटीएनएल या कंपनीकडे सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) 326 कोटी रुपये थकीत आहेत. त्यापैकी २८१.६२ कोटी रुपये थकीत होते. जून महिन्यापासून कंपनीला कर्जाचा हप्ता बँकेत भरता आलेला नाही. यानंतर बँकेने एमटीएनएलचे खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) म्हणून घोषित केले आहे. बँकेने एमटीएनएलला कर्जाची थकित रक्कम त्वरित जमा करण्यास सांगितले आहे.
बँकेकडून कायदेशीर कारवाईचा इशारा
कर्ज भरण्याबाबत बँकेने एमटीएनएलला पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, कंपनीने घेतलेल्या कर्जावरील हप्ता आणि व्याज 30 जून 2024 रोजी थकीत झाले होते. तो ९० दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. आतापर्यंत कंपनीने कर्जाचा हप्ता भरलेला नाही. अशा परिस्थितीत 28 सप्टेंबरपासून कंपनीचे कर्ज खाते एनपीए श्रेणीत उतरवण्यात आले आहे. एसबीआयने एमटीएनएलला कर्जाची रक्कम त्वरित भरण्यास सांगितले आहे. जर कंपनीने पैसे भरण्यास उशीर केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. असेही बँकेने म्हटले आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
बँकेने मागितली मालमत्तेची माहिती
बँकेने एमटीएनएलच्या थकबाकीच्या परतफेडीवर सरकारकडून गॅरंटीच्या स्थितीबद्दल देखील माहिती मागवली आहे. याशिवाय एसबीआयने एमटीएनएलद्वारे चालवल्या जाणाऱ्या मालमत्ता मुद्रीकरण प्रकल्पांचे तपशीलही मागवले आहेत. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी दिल्लीतील 13.88 एकर जमीन विकसित करण्यासाठी एनबीसीसीसोबत केलेल्या कराराचा तपशील समाविष्ट आहे.
एमटीएनएलवर कर्जाचा डोंगर
एमटीएनएलवर 30 ऑगस्ट 2024 पर्यंत एकूण 32 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले होते की, ऑगस्टमध्ये सुमारे 422 कोटी रुपयांचे कर्ज भरण्यात अयशस्वी झाली होती. यामध्ये अनेक बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यासाठी कंपनी मुंबई आणि दिल्लीतील 150 हून अधिक मालमत्ता वाचवण्याचा विचार करत आहे. एसबीआयव्यतिरिक्त आता इतर बँका देखील एमटीएनएल कंपनीवर कठोर कारवाई करू शकतात.