(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
चित्रपटप्रेमींना खास आनंदाची बातमी! २२ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव शुक्रवार, ९ जानेवारीपासून मुंबईत सुरू होत आहे. या महोत्सवात ५० पेक्षा जास्त देशांमधील विविध भाषांतील चित्रपटांचा समावेश आहे, ज्यामुळे सिनेप्रेमींना एक अद्वितीय अनुभव मिळणार आहे.
यंदाच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण मराठी चित्रपट आहेत. यात दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा बहुचर्चित आगामी हिंदी सिनेमा ‘मयसभा’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांचा ‘उत्तर’ आणि दिग्दर्शक संतोष डावखर यांचा ‘गोंधळ’ आदी कलाकृतींचा समावेश आहे. सान चित्रपट महोत्सवात FIPRESCI ज्युरी पुरस्कार पटकावलेल्या ‘ऑन यूअर लॅप’ (पांगकू) या इंडोनेशियन चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
निवडलेले चित्रपट प्रभादेवीतील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील मिनी थिएटर आणि ठाण्यातील लेक शोर मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात दाखवले जाणार आहेत. ९ दिवसांच्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे सशुल्क रजिस्ट्रेशन आजच करा आणि एकापेक्षा एक लक्षणीय चित्रपटांचा आनंद घ्या.
महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शिका पद्मभुषण सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ देण्यात येणार आहे. आणि दिग्दर्शिका उमा दा कुन्हा यांना ‘सत्यजित रे स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे. दिवंगत सुधीर नांदगांवकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार चित्रपट अभ्यासक आणि क्युरेटर मिनाक्षी शेड्डे यांना प्रदान करण्यात येणार आहे.






