लवकरच होणार 'या' सरकारी बँकेचे खासगीकरण; केंद्र सरकारकडून प्रक्रियेला गती!
इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात आयडीबीआय बँक या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँकेचे लवकरच खासगीकरण होणार आहे. देशातील चौथी सर्वात मोठी बँक असलेल्या आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाबाबत केंद्र सरकारने आता एक पाऊल पुढे टाकले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आपल्या पडताळणीनंतर बँकेचा फिट अँड प्रॉपर रिपोर्ट सादर केला आहे.
खरेदीची पुढील कारवाई होणार
परिणामी, आता आयडीबीआय बँक खरेदी करण्यासाठी खरेदीदार पुढील कारवाई करू शकणार आहे. विशेष म्हणजे आता चालू आर्थिक वर्षातच आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणासाठी खरेदीदारांकडून बोली लावली जाऊ शकते. देशातील एका आघाडीच्या बिझनेस वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त देत म्हटले आहे की, केंद्र सरकार आयडीबीआय बँक विकण्याबाबत वेगाने प्रक्रिया राबवत आहे. सरकारला चालू आर्थिक वर्षात आयडीबीआय बँक विकण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आरबीआयचा अहवाल प्रसिद्ध झाल्याने, आता इच्छुक खरेदीदार ऑगस्टमध्ये बोली लावू शकणार आहे.
हेही वाचा : बांधकाम व्यवसायाला “अच्छे दिन”, सळईचे दर नरमले; घर बांधायचंय… मग आत्ताच ठेवा मागवून!
खरेदी व्यवहार झाल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने आयडीबीआय बँकेच्या व्हर्च्युअल डेटा रूममध्ये खरेदीदारास प्रवेश मिळणार आहे. जेणेकरून ते बँकेच्या आर्थिक स्थितीचा अचूक अंदाज लावू शकतील, असेही या वृत्तात म्हटले आहे. याशिवाय बँकेच्या शेअर खरेदी कराराबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो. असेही सांगितले जात आहे.
किती हिस्सा विकला जाणार?
केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यांची आयडीबीआय बँकेमध्ये सर्वाधिक हिस्सेदारी आहे. या दोघांना आयडीबीआय बँकेतील सुमारे ६१ टक्के हिस्सा विकायचा आहे. यापैकी सरकार 30.48 टक्के आणि एलआयसी 30.24 टक्के स्टॉक विकणार आहे. निर्गुंतवणूक विभागाने आयडीबीआय बँकेचे भागभांडवल खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या बोलीदारांची नावे आधीच आरबीआय बँकेकडे पाठवली आहेत.
हेही वाचा : 20 हजार नोकऱ्या, 20,000 कोटींची गुंतवणूक; ‘या’ जिल्ह्यात उभारला जाणार टोयोटाचा प्लांट!
दरम्यान, अर्थमंत्रालयाचे सचिव तुहीन कांत पांडे यांनी अर्थसंकल्प काळात म्हटले होते की, आम्ही आरबीआयच्या अहवालाची वाट पाहत आहोत. हा अहवाल येताच आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
अनेक दिवसांपासून रखडलीये प्रक्रिया
आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाची प्रक्रिया गेल्या अनेक दिवसांपासून रखडली आहे. जवळपास ऑक्टोबर 2022 पासून आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे आले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही सरकारने ही प्रक्रिया पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, खरेदीदारांच्या अल्प प्रतिसादामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. बुधवारी (ता.३१) आयडीबीआय बँकेचा समभाग ५४ पैशांच्या किंचित घसरणीसह १०३.६५ रुपयांवर बंद झाला आहे.