भारताने पाकिस्तानसाठी सर्व व्यापारी मार्ग केले बंद! आखाती देशांमधून येणाऱ्या शिपमेंटचीही कसून तपासणी (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
भारत युएई, इराण आणि इतर आखाती देशांमधून येणाऱ्या सर्व शिपमेंटची कसून तपासणी करत आहे. याद्वारे सरकार पाकिस्तानमधून येणारा कोणताही माल कोणत्याही मार्गाने भारतात पोहोचू नये याची खात्री करू इच्छिते. सरकार ट्रान्सशिपमेंट हबमधून येणाऱ्या वस्तूंची देखील तपासणी करत आहे.
याशिवाय, पाकिस्तानी वस्तू कोणत्याही तिसऱ्या देशातून भारतात पोहोचतात का यावरही अधिकारी लक्ष ठेवून आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील सर्व व्यापार बंद आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, युएई आणि आखाती देशांमधून आयात केलेल्या वस्तूंचे लेबल आणि मूळ देश, म्हणजेच जिथे ते उत्पादित केले गेले होते, त्यांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले होते की, ‘ही बंदी राष्ट्रीय सुरक्षेअंतर्गत लादण्यात आली आहे.’
पाकिस्तानशी व्यापारी संबंध संपल्यानंतरही, पाकिस्तानी खजूर यूएईमार्गे देशात येत होते. भारताने याबद्दल यूएईकडे चिंता व्यक्त केली होती. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, हा भारत-यूएई व्यापक आर्थिक भागीदारी कराराचा गैरवापर आहे.
आर्थिक वर्ष २५ मध्ये भारताने युएईला ३६.६३ अब्ज डॉलर्स (₹१.१४ लाख कोटी) किमतीच्या वस्तू निर्यात केल्या. तर आयात एकूण $६३.४२ अब्ज (₹५.४३ लाख कोटी) होती.
आर्थिक वर्ष २५ च्या एप्रिल-फेब्रुवारी दरम्यान, भारताची खजूर आयात $२७०.४ दशलक्ष (₹२,३१५ कोटी) होती, ज्यामध्ये UAE ने $१२३.८२ दशलक्ष (₹१,०६० कोटी) योगदान दिले.
२०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान व्यापारी संबंध बिघडले होते. त्यानंतर भारताने शेजारील देशातून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवरील आयात शुल्क २००% पर्यंत वाढवले. यामध्ये ताजी फळे, सिमेंट, पेट्रोलियम उत्पादने आणि खनिज धातूंचा समावेश आहे.
२०१७-१८ च्या सुरुवातीला, पाकिस्तानची भारताला होणारी निर्यात ४८८.५ दशलक्ष डॉलर्स होती. त्यावेळी पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या दोन मुख्य वस्तू म्हणजे फळे आणि सिमेंट. २०० टक्के आयात शुल्क लादणे म्हणजे आयातीवर अक्षरशः बंदी घालणे.
पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, ७ मे रोजी पहाटे १ वाजता भारताने पाकिस्तानच्या ७ शहरांमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. तिन्ही सैन्यांनी संयुक्तपणे केलेल्या पाकिस्तानवरील या हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. भारताच्या या कृतीमुळे पाकिस्तानने सर्व प्रकारचे व्यापार थांबवण्याची घोषणा केली होती.