पंतप्रधान मोदींच्या स्वप्नांना बळ! 2029 मध्ये भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल - आयएमएफ
नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर, देशाला तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मोदी सरकारचा हा कार्यकाळ २०२९ पर्यंत चालणार आहे. अशातच आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) २०२९ पर्यंत भारत तिसरी अर्थव्यवस्था बनेल, असे सांगण्यात आले आहे. सध्याच्या घडीला भारत हा जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
२०२९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था असेल 6.44 ट्रिलियन डॉलरची
जगातील पहिल्या चार अर्थव्यवस्थांमध्ये अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान हे देश आहेत. तर येत्या पाच वर्षात भारत जर्मनी आणि जपान या देशांना पछाडत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. असे आयएमएफने म्हटले आहे. तेव्हा २०२९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही 6.44 ट्रिलियन डॉलर मूल्याची असणार आहे. तर जर्मनीची अर्थव्यवस्था ही 5.36 ट्रिलियन डॉलर आणि जपानची अर्थव्यवस्था ही 4.94 ट्रिलियन डॉलर असणार आहे. भारत सध्या सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर आला आहे. असेही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.
जर्मनी, जपानच्या अर्थव्यवस्थांच्या संघर्ष
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) माहितीनुसार, २०२९ मध्ये अमेरिका 34.95 ट्रिलियन डॉलरसह जगातील सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्था कायम राहणार आहे. याशिवाय चीन हा देखील 24.84 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून कायम राहणार आहे. तर जर्मनी आणि जपान या देशांची अर्थव्यवस्था मात्र संघर्ष करताना दिसून येणार आहे. सध्याच्या स्थितीतच जपानच्या केंद्रीय बँकेकडून व्याजदरात वाढ केली जात आहे. असेही आयएमएफने म्हटले आहे.
चीनचे रिअल इस्टेट क्षेत्र मोठ्या संकटात
याशिवाय मागील दोन दशकांपासून चीनची अर्थव्यवस्था देखील विविध पातळीवर संघर्ष करताना दिसून येत आहे. चीनचे रिअल इस्टेट क्षेत्र मोठ्या संकटात सापडले आहे. या क्षेत्राचा चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये तब्बल ३० टक्के हिस्सा आहे. रिअल इस्टेट क्षेत्रामुळे चीनमधील बँकाच्या अर्थकारणावर देखील मोठा परिणाम झाला आहे. याउलट भारतीय अर्थव्यवस्था प्रत्येक पातळीवर वेगाने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) माहितीनुसार, पुढील दोन ते तीन वर्ष भारत हा सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून कायम राहणार आहे.