टीसीएस, रिलायन्स नाही, तर 'या' बँकेच्या शेअरची कमाल, 5 दिवसांत गुंतवणूकदारांनी कमावले 32 हजार कोटी!
मागील आठवडा केवळ भारतीय शेअर बाजारासाठीच नाही तर जगभरातील शेअर बाजारांसाठी घसरणीचा ठरला आहे. भारतीय शेअर बाजारात प्रामुख्याने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई) सेन्सेक्स निर्देशांकातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 8 च्या बाजार मूल्यात मोठी घसरण झाली आहे. मात्र, असे असतानाही देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले त्यांनी अवघ्या 5 दिवसांत सुमारे 32,000 कोटी रुपये कमावले आहेत.
बँकेच्या बाजारमूल्यात 32,759.37 कोटींनी वाढ
भारतीय शेअर बाजारात एकीकडे सेन्सेक्समधील टॉप 8 कंपन्यांचे बाजार भांडवल गेल्या आठवड्यात घटले. याउलट एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवलेले गुंतवणूकदार मालामाल झालेले पाहायला मिळाले. विशेष म्हणजे बँकेचे बाजारमूल्य 32,759.37 कोटी रुपयांनी वाढून, 12,63,601.40 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी एलआयसीनेही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. एलआयसीचे मार्केट कॅप पाच दिवसांत 1,075.25 कोटींनी वाढून, 7,47,677.98 कोटींवर पोहोचले आहे.
हेही वाचा : …’या’ 76 रुपयांच्या आयपीओवर तुटून पडले गुंतवणूकदार; अजूनही आहे खरेदीची संधी!
एचडीएफसी बँकेचा शेअर 1658.05 रुपयांवर
शुक्रवारी (ता.२) भारतीय शेअर बाजारात प्रामुख्याने मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) 30 शेअरच्या सेन्सेक्समध्ये 1.08 अंकाची घसरण झाली. तो 80,981.95 अंकावर बंद झाला. तर एनएसई निफ्टीमध्ये 1.17 टक्क्यांची घसरण होऊन, तो 24,717.70 अंकावर बंद झाला. असे असूनही एचडीएफसी बँकेच्या शेअरने गेल्या आठवड्यात जोरदार कमाई केली. शुक्रवारी बँकेचा शेअर 1.17 टक्क्यांनी वधारला. त्यामुळे बँकेचा शेअर 1658.05 रुपयांच्या स्तरावर पोहचला.
कंपन्यांच्या यादीत रिलायन्सचे वर्चस्व कायम
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली असली तरी, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने टॉप-10 मौल्यवान कंपन्यांच्या यादीत वर्चस्व कायम राखले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज टॉप-10 मौल्यवान कंपन्यांच्या पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर TCS, HDFC बँक, भारती एअरटेल, ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, LIC, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि ITC यांना क्रमवारीत स्थान मिळाले आहे.