WFH वरून JPmorgan chase चे CEO भडकले, म्हणाले,"ऑफिसला या अन्यथा...
Covid काळात भारतीय वर्क कल्चरमध्ये वर्क फ्रॉम होम ही कामाची पद्धत सुरु झाली. जी आज देखील सुरु आहे. फक्त भारतातच नव्हे जगभरात अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना WFH ची सुविधा ऑफर करतात. तसेच काही कंपन्या हायब्रीड पद्धतीने देखील काम करत असतात, ज्यात आठवड्यातून काही दिवस ऑफिसमधून, तर काही दिवस घरून काम करावे लागते. पण आता JPmorgan chase च्या सीईओने WFH च्या विरोधात भाष्य केले आहे.
अमेरिकेतील सर्वात मोठ्या बँकेचे सीईओ जेमी डिमन (Jamie Dimon) यांनी कर्मचाऱ्यांच्या हायब्रिड वर्क सिस्टमच्या मागणीला कडक शब्दात नाकारले आहे. कर्मचाऱ्यांनी कंपनीला 5 डे रिटर्न-टू-ऑफिस (RTO) धोरणाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती.
टाउन हॉल बैठकीत डिमनने कर्मचाऱ्यांची अंतर्गत याचिका स्पष्टपणे फेटाळून लावली. “यावर वेळ वाया घालवू नका,” असे डिमन यांनी कडक स्वरात सांगितले. या याचिकेवर किती लोक सही करतात याची मला पर्वा नाही. कर्मचाऱ्यांकडे दोन पर्याय आहेत. एकतर त्यांनी ऑफिसमध्ये येऊन काम करावे, किंवा त्यांनी दुसरी नोकरी शोधावी, असे देखील ते यावेळी म्हणाले.
10 जानेवारी रोजी, जेपी मॉर्गन चेसने त्यांच्या 3.17 लाख कर्मचाऱ्यांना हायब्रिड वर्क सिस्टीम संपुष्टात येत असल्याची माहिती दिली. फेब्रुवारीपासून सर्व कर्मचाऱ्यांना पाच दिवस ऑफिसमध्ये यावे लागेल. अनेक कर्मचाऱ्यांनी, विशेषतः बॅक-ऑफिस कर्मचाऱ्यांनी, या निर्णयाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी सांगितले की या बदलाचा वर्क लाइफ बॅलन्सवर वाईट परिणाम होईल. केयरगिवर्स, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना याचा सर्वाधिक फटका बसेल.
जेपी मॉर्गनच्या रिटर्न-टु-ऑफिसच्या नियमाविरुद्ध 1,200 हून अधिक कर्मचाऱ्यांनी याचिकेवर स्वाक्षरी केली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होईल, असे त्यात म्हटले आहे. तथापि, डिमनने त्यांचे सर्व युक्तिवाद एकाच झटक्यात फेटाळून लावले.
डिमन हे रिमोट वर्कचे कडक टीकाकार आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की यामुळे उत्पादकतेत घट होते. त्यांनी आपला मुद्दा मांडला, COVID पासून मी आठवड्याचे सातही दिवस काम करत आहे. जेव्हा मी ऑफिसमध्ये येतो तेव्हा बाकीचे कुठे असतात?”
शुक्रवारी त्यांनी विशेषतः घरून काम करण्यावर (WFH) लक्ष केंद्रित केले. ते म्हणाले, “शुक्रवारी घरून काम केल्याने सगळं व्यवस्थित होईल असं मला सांगू नका. मी शुक्रवारी अनेक लोकांना फोन करतो, पण कोणीही उत्तर देत नाही.”
यापूर्वी, जेपी मॉर्गन चेसचे विश्लेषक निकोलस वेल्च यांना डिमन यांच्या आरटीओ धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर लगेचच त्यांना काढून टाकण्यात आले. वेल्चवर घटस्फोटाची समस्या उद्भवली होती. ज्यामुळे त्याला कामात फ्लेक्सिबिलटी हवी होती. त्यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांना किती दिवस ऑफिसमध्ये बोलावायचे हे ठरवण्याचा अधिकार खालच्या पोजिशनवरील मॅनेजर्सना असावा.
कर्मचाऱ्यांनी त्याचे कौतुक केले, पण डिमनने लगेचच सूचना नाकारली. या बैठकीनंतर लगेचच, वेल्चच्या सुपरवाइझरने त्याला ऑफिसमधून निघून जाण्यास सांगितले. परंतु, काही तासांनंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने निर्णय उलटवला आणि त्याला पुन्हा कामावर ठेवले.