फोटो सौजन्य - Social Media
डायना ही एक लहानशी पण जगभर प्रसिद्ध झालेली यूट्यूब स्टार आहे. ती मूळची युक्रेनमधील कीव शहरातील आहे, पण सध्या तिचं संपूर्ण कुटुंब दुबईमध्ये राहतं. “Kids Diana Show” नावाच्या यूट्यूब चॅनलवर ती तिच्या छोट्या भावासोबत, रोमासोबत, वेगवेगळी खेळणी, वाढदिवसाच्या पार्टीज, आणि मुलांसाठी खूप मजेशीर व रंगीत व्हिडिओ करत असते. सध्या या चॅनलला तब्बल १३५ मिलियनहून अधिक लोकांनी सब्सक्राइब केलं आहे, ज्यामुळे हा चॅनल जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा यूट्यूब चॅनल बनला आहे.
हा चॅनल डायना एक वर्षाची असताना सुरू झाला. तिच्या आई-वडिलांनी तिला पान खाताना एक व्हिडिओ बनवला होता, तो केवळ नातेवाईकांसाठी होता. पण तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की त्याला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. तेव्हाच तिच्या आई-वडिलांनी ठरवलं की आता या चॅनलवर पूर्ण वेळ काम करायचं.
डायनाचं संपूर्ण कुटुंब आता हा यूट्यूब चॅनल चालवतं. तिची आई ओलेना ही व्हिडिओसाठी कल्पना सुचवते, वडील वोलोडिमिर हे पैशाचं नियोजन करतात, तर एक मोठी टीम चित्रीकरण आणि एडिटिंगचं काम पाहते. “Kids Diana Show” व्यतिरिक्त त्यांनी आणखी २० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनल्स सुरू केले आहेत, जे मिळून दर महिन्याला १० अब्जांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवतात.
‘The Economist’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकानुसार, डायनाच्या चॅनलवरून दरवर्षी सुमारे १० मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ८३ कोटी रुपये कमाई होते. तिच्या चॅनलने Mattel सारख्या मोठ्या खेळणी कंपन्यांसोबत करार देखील केले आहेत. डायनाचे व्हिडिओ अमेरिका, भारत, ब्राझील, स्पेन आणि मिडल ईस्टमध्ये खूप पाहिले जातात. डायना म्हणते की, तिला मुलांचं मनोरंजन करायचं आहे आणि त्यांच्या आई-वडिलांना थोडी विश्रांती द्यायची आहे. तिचे व्हिडिओ मजेदार, आकर्षक आणि शिक्षण देणारे असतात. त्यामुळेच लहान मुलांपासून पालकांपर्यंत सगळेच डायनाचे फॅन झाले आहेत.