फोटो सौजन्य: Facebook
“मी अचूक निर्णय घेत नाही तर घेतलेल्या निर्णयांना अचूक बनवतो” हे म्हणणे आहे भारतातील थोर उद्योजक रतन टाटा यांचे. आणि याच वाक्याला साजेशी अशी गोष्ट आहे अर्जुन देशपांडेची, ज्याला भारतीय फार्मा क्षेत्रातील रॉबिनहूड असे देखील म्हणले जाते.
अर्जुन हा मुंबईस्थित स्टार्टअप जेनेरिक आधारचा फाउंडर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. जेनेरिक आधार ही एक जेनेरिक औषधांसाठी एंड-टू-एंड ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे ज्याचा उद्देश देशातील प्रत्येक नागरिकासाठी उच्च-गुणवत्तेची औषधे परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करून देणे आहे.
१६ वरीस स्वप्नांचं
अर्जुन नेहमीपासूनच आपल्या आजुबाजुच्या समस्या निक्षुन पाहायचा. त्याचा उद्योजकीय प्रवास महाविद्यालयीन काळात सुरू झाला जेव्हा त्याने लोकांसाठी परवडणारी औषधे उपलब्ध नसल्याचं निरीक्षण केले. 2018 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी, त्यांनी एका कंपनीची स्थापना केली जी सामान्यत: फार्मसीमध्ये आढळणाऱ्या ब्रँडेड औषधांना पर्याय म्हणून स्वस्त आणि परवडणारी जेनेरिक औषधे देत होती. याच महत्वाकांक्षी निर्णयामुळे आज २२ व्या वर्षी अर्जुनच्या कंपनीचा टर्नओव्हर तब्बल 1500 कोटींचा झाला आहे.
अर्जुनचे कष्ट फळास आले जेव्हा त्याची कंपनी ही 500 कोटींची बनली. या त्याच्या उत्तुंग कामगिरीवर उद्योगक्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले. यातीलच एक होते रतन टाटा. TED talk वर आपले विचार मांडताना अर्जुनने फार्मा सेक्टवर आपला दृष्टिकोन प्रकट केला होता. हाच दृष्टिकोन रतन टाटा यांना भावला आणि त्यांनी जेनेरिक आधार कंपनीला आपल्या गुंतवणुकीचा आधार दिला.
अर्जुनची कामगिरी भारतातील तरुण उद्योजकांमध्ये मोठ्या प्रमाणावर ओळखली जाते. यामुळेच त्याचे नाव फोर्ब्सच्या 30 अंडर 30 एशिया आणि फॉर्च्युन इंडिया 40 अंडर 40 या यादीत आले होत. एप्रिल 2023 साली अर्जुन देशपांडेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून देशाच्या लोकसंख्येसाठी स्वस्त औषधे बनविण्याच्या प्रयत्नांबद्दल प्रशंसा मिळाली. तसेच त्याला “wonder kid of pharma” असे देखील संबोधले.