MRF (Photo Credit -X)
MRF Share Price: भारतातील सर्वात महागडा शेअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या MRF Ltd च्या शेअरने मंगळवारी नवा विक्रम रचला. शेअरच्या किमतीने नवीन सर्वकालीन उच्चांक गाठत 1,53,943 रुपयांवर बंद झाला. गेल्या व्यवहाराच्या तुलनेत एकाच दिवसात या शेअरची किंमत प्रति शेअर ₹9093.55 नी वाढली, जी 6.28% ची मजबूत वाढ दर्शवते. सोमवारी शेअरचा भाव ₹1,44,850.35 होता, तर मंगळवारी तो ₹144950.05 वर उघडला.
शेअरच्या या वाढीमागे एक मुख्य कारण म्हणजे जीएसटी दरात कपात होण्याची शक्यता. ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ATMA) ने सरकारला टायर्सवरील जीएसटी दर सध्याच्या 28% वरून 5% पर्यंत कमी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी टायर्सना ‘लक्झरी वस्तू’ मानले जाऊ नये, अशी विनंती केली आहे, कारण त्यांचा वापर दळणवळण, शेती, खाणकाम आणि बांधकाम यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये होतो. या मागणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आणि शेअरमध्ये जोरदार वाढ दिसून आली.
MRF चा शेअर गेल्या काही दशकांपासून सातत्याने वाढत आहे. 1990 मध्ये केवळ 332 रुपये असलेला हा शेअर, 2000 मध्ये 2,820 रुपयांवर पोहोचला. 2020 पर्यंत हा भाव ₹70,964 झाला. विशेष म्हणजे, गेल्या 5 वर्षांत या शेअरने 1.50 लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे. यावरून कंपनीची प्रगती आणि यशस्वी वाटचाल स्पष्ट होते, ज्यामुळे ती देशातील सर्वात महागड्या स्टॉक्सपैकी एक बनली आहे.
Stock Market Closing Today: ऑटो, फार्मा शेअर कोसळून बाजार घसरला, टॉप गेनर आणि लूजर वाचा यादी
2025च्या सुरुवातीला MRF च्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. 4 मार्च रोजी एका शेअरची किंमत १ लाख रुपयांच्या आसपास पोहोचली होती, ज्यामुळे गुंतवणूकदार थोडे चिंतेत होते. मात्र, त्यानंतर या शेअरने अशी काही जबरदस्त रिकव्हरी केली की गुंतवणूकदारांचे चांदी-चांदी झाली.
गेल्या सहा महिन्यांत या शेअरने 45.35 टक्के वाढ नोंदवली असून, त्याच्या किमतीत ₹47,699.75 रुपयांची मोठी उसळी आली आहे. जर गेल्या एका वर्षाची कामगिरी पाहिली, तर गुंतवणूकदारांना तब्बल 161.65 टक्के परतावा (रिटर्न) मिळाला आहे, जो कोणत्याही शेअरसाठी एक उत्कृष्ट कामगिरी आहे.
आज MRF लिमिटेड ही टायर उद्योगात अव्वल कंपनी आहे, पण तिचा प्रवास खूपच रंजक आहे. सुरुवातीला टायर बनवण्याऐवजी कंपनी फुगे बनवत होती. के.एम. मामेन मपिल्लई यांनी 1946 मध्ये मद्रास येथील एका छोट्या शेडमध्ये फुगे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. यासोबतच ते औद्योगिक हातमोजे आणि लेटेक्सपासून बनवलेल्या वस्तूंचे उत्पादनही करू लागले. मागणी वाढल्यानंतर त्यांनी व्यवसायाचा विस्तार करत टायर बनवण्यास सुरुवात केली आणि 1952 मध्ये मद्रास रबर फॅक्टरी (MRF) ची स्थापना केली. या छोट्याशा व्यवसायातूनच आज MRF देशातील सर्वात महागड्या आणि यशस्वी कंपन्यांपैकी एक बनली आहे.