टाकाऊ पासून टिकाऊ बनले 'माय थ्रिफ्ट बेबी लूट', आज आहे इतक्या कोटींची मालकीण! कोण आहे उद्योजिका? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Anisha Shetty Success Story Marathi News: मुंबईतील प्रसिद्ध उद्योजिका अनिशा शेट्टी यांनी पालकांना भेडसावणाऱ्या एका सामान्य समस्येचे निराकरण करण्यासाठी ‘माय थ्रिफ्ट बेबी लूट’ची स्थापना केली आहे. ज्याद्वारे मुलांची वाढ लवकर होत असताना, अशा बालकांसाठी आवश्यक उत्पादने काय असावीत, यावर उपाय सांगण्यात येत आहेत. दोन मुलांची आई असलेल्या अनिशा यांना, महागड्या पण क्वचितच वापरल्या जाणाऱ्या वस्तूंबाबत काय करावे, असा प्रश्न पडला होता. अशावेळी या महागड्या वस्तू पुन्हा विकण्याचा किंवा दान करण्याचा कोणताही संरचित किंवा भरवशाचा मार्ग त्यांच्यासमोर नव्हता. जेव्हा त्यांच्याकडील सुरुवातीच्या वस्तू त्वरित विकल्या गेल्या आणि इतर मातांनी त्यांना कृतज्ञतेने प्रतिसाद दिला, तेव्हा ही कल्पना आकारास आली. यामुळे त्यांनी मातांच्या नेतृत्वाखालील, समुदाय-चालित एक व्यासपीठ तयार केले जे बालकांसाठी आवश्यक असलेल्या उत्पादनांची खरेदी, विक्री आणि दान करणे सुलभ करते.
पालकांना आता गरज नसलेल्या उत्पादनांना काढून टाकण्यास आणि त्यांचे मूल्य वाढविण्यास मदत करून, इतर पालक बाजारापेक्षा खूपच कमी किमतीत या आवश्यक वस्तू खरेदी करू शकतात, ज्यामुळे पैसे वाचतात. हा उपक्रम पुनर्वापर आणि शाश्वततेच्या संकल्पनेला प्रोत्साहन देतो, एक वर्तुळाकार परिसंस्था तयार करतो आणि प्रत्येक उत्पादनाचे आयुष्य वाढवतो, त्याचा कार्बन फूटप्रिंट कमी करतो.
‘माय थ्रिफ्ट बेबी लूट’ची स्थापना झाल्यापासून या व्यासपीठाद्वारे १,४०० हून अधिक ग्राहकांच्या चार हजारहून हून अधिक ऑर्डर पूर्ण करण्यात आल्या आणि २३ हजारहून अधिक मातांचा एक उत्साही समुदाय देखील तयार झाला आहे. इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि संकेतस्थळाद्वारे संपूर्ण भारतात कार्यरत असलेले ‘माय थ्रिफ्ट बेबी लूट’ आता ग्राहकांचा अनुभव अधिक वृद्धिंगत करण्यासाठी एक ‘कस्टम-कोडेड’ अॅप विकसित करत आहे. हा समूदाय अजूनही अवलंबून आणि आशावादी आहे. संपूर्ण भारतातील लहान ‘थ्रिफ्ट स्टोअर्स’सह सहयोग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महिला स्टार्टअप कार्यक्रम (डब्ल्यूएसपी) इनक्युबेशन प्रोग्रामद्वारे, अनिशा यांना धोरणात्मक स्पष्टता मिळाली असून त्यांनी आता स्पर्धकांकडे पाहण्याची मानसिकता सोडून सहयोगींना ओळखण्याची मानसिकता निर्माण केली आहे. यामुळे त्यांना ‘नफा वाटणी मॉडेल’अंतर्गत इतर ‘थ्रिफ्ट स्टोअर्स’मध्ये सहभागी होण्यास आणि ‘ऑफलाइन पॉप-अप’सह (तात्पुरते स्टोअर) प्रयोग करण्यास प्रेरित केले, ज्यामध्ये मुंबईतील कोटक महिंद्रा बँकेचाही समावेश होता. या कार्यक्रमाच्या रचनेमुळे अनिशा यांना त्यांच्या व्यवसायातील दिशादर्शक मार्ग सुधारण्यास आणि नवीन वाढीच्या संधींना वाट मोकळी करून देण्यास मदत झाली.
‘हर सर्कल बिझ्रप्टर ऑफ द इयर’ (२०२४) आणि ‘इन्स्पायर बियॉन्ड मदरहूड’ (२०२४) यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या आणि ‘कॉर्नेल महा६० अॅक्सिलरेटर’साठी निवड झालेल्या अनिशा यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे भारतभर मोठ्या प्रमाणात कौतुक झाले आहे. भविष्यात, त्या तंत्रज्ञानातील नवोपक्रमाद्वारे व्यासपीठाचा विस्तार करणे, विक्रेत्यांचे जाळे (नेटवर्क) मजबूत करणे आणि वाढवणे तसेच शाश्वत पालकत्वासाठी भारतातील भरवशाचे ठिकाण म्हणून ‘माय थ्रिफ्ट बेबी लूट’ची ओळख प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.
‘कोटक महिंद्रा बँक लिमिटेड’ आणि ‘एनएसआरसीईएल-आयआयएम बंगळुरू’ यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाच्या (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी – सीएसआर) अंतर्गत महिला स्टार्टअप कार्यक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश देशभरातील इच्छुक महिला उद्योजकांना सक्षम करणे आहे. शिक्षण आणि उपजीविकेसाठी ‘केएमबीएल’च्या ‘सीएसआर’ उपक्रमांतर्गत सुरू केलेला हा उपक्रम महत्त्वाकांक्षी आणि नावीन्यपूर्ण महिलांना एकप्रकारे शाश्वत व्यवसाय उभारण्यास सक्षम करून त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करतो.
महिला स्टार्टअप कार्यक्रमाने २६,०८९ हून अधिक महिलांसाठी उत्प्रेरक म्हणून काम केले आहे, ज्यामुळे त्यांना उद्योजकता आणि व्यवस्थापकीय कौशल्ये विकसित करण्यास मदत झाली आहे. या उपक्रमातील उद्योजक तंत्रज्ञान, सामाजिक परिणाम, शेती, किरकोळ विक्री, आरोग्यसेवा, ऊर्जा आणि पर्यावरण, वस्त्रोद्योग आणि इतर अनेक अशा २० हून अधिक विविध क्षेत्रांमधून येतात. ते भारतातील २४ राज्यांचे प्रतिनिधित्व करतात. आजपर्यंत, या कार्यक्रमाने ६५८ हून अधिक उपक्रमांना संसाधने आणि मार्गदर्शनाद्वारे पाठिंबा दिला आहे आणि २,५९३ नोकऱ्या निर्माण करण्यास मदत केली आहे.