फोटो सौजन्य - Social Media
भारतभरातील रेरा-नोंदणीकृत व परवानाधारक स्थावर मालमत्ता व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅशनल असोसिएशन ऑफ रिअलटर्स-इंडिया (एनएआर-इंडिया) या सर्वोच्च संस्थेने मॅजिकब्रिक्स रिअल्टी सर्व्हिसेस लिमिटेड विरोधात गैर-सहकार्याचे आदेश जाहीर करत एक निर्णायक भूमिका घेतली आहे. मॅजिकब्रिक्सने नुकतेच प्रकाशित केलेल्या व्हिडिओंमध्ये दलालांची प्रतिमा मलिन करण्यात आली असून, यावरून एनएआर-इंडिया आणि मालमत्ता क्षेत्रातील व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मॅजिकब्रिक्सच्या या मोहिमांमध्ये स्थावर मालमत्ता दलालांना चुकीचे दर्शवले गेले असून, त्यांची भूमिका गौण समजून दुर्लक्षित केली गेली आहे. विशेष म्हणजे, याच दलालांच्या माध्यमातून मॅजिकब्रिक्सने व्यवसाय उभारला असूनही त्यांचाच अनादर होत असल्याचे एनएआरने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर एनएआर-इंडियाने आपले सर्व सदस्य, एजंट्स आणि व्यावसायिकांना मॅजिकब्रिक्ससह व्यावसायिक व्यवहार, जाहिराती, लिस्टिंग तत्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. या संस्थेशी कोणतेही संबंध ठेवू नयेत, जोपर्यंत मॅजिकब्रिक्सने सार्वजनिक माफीनामा आणि लेखी वचनबद्धता दिलेली नाही, असे ठाम सांगण्यात आले आहे.
एनएआरचे अध्यक्ष सुमंत रेड्डी यांनी म्हटले की, “ही केवळ एका मोहिमेविरुद्धची प्रतिक्रिया नाही, तर दलालांच्या भूमिकेचा वर्षानुवर्षांपासून चालत आलेला अपमान संपवण्याची वेळ आली आहे. दलाल हे केवळ सहायक नाहीत, तर स्थावर मालमत्ता क्षेत्राचा कणा आहेत.” एनएआरचे माजी अध्यक्ष अमित चोप्रा यांनीही स्पष्ट केले की, “तांत्रिक प्रगतीचे स्वागत आम्ही करतो, मात्र दलालांबद्दल अपप्रचार, अनादर आणि चुकीची माहिती हे सहन केले जाणार नाही.”
एनएआर-इंडियाने आता ग्राहक संरक्षण संस्था व नियामकांकडे अपील करत मॅजिकब्रिक्सच्या मोहिमांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर, डिजिटल जाहिरात व स्थावर मालमत्ता क्षेत्रात नैतिक मानकांची अंमलबजावणी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. 2008 मध्ये स्थापन झालेली एनएआर-इंडिया ही एक ना-नफा संस्था असून, 30,000 हून अधिक सदस्यांना मार्गदर्शन करते आणि उद्योगात उच्च नैतिकतेचे पालन करण्यास प्रोत्साहित करते.