...आता कर्करोगावरील औषधांवर केवळ 5 टक्के जीएसटी लागणार; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय!
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.९) जीएसटी कौन्सिलची ५४ वी बैठक पार पडली आहे. या बैठकीत आज जीएसटी कौन्सिलने कॅन्सरच्या औषधांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कर्करोगावरील औषधांवर १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. परिणामी आता कर्करोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत २३ जुलै रोजी संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली होती. त्यास अखेर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत आरोग्य विमा आणि जीवन विम्याच्या प्रीमियम पेमेंटवरील जीएसटी कमी करण्यावर चर्चा झाली. त्यानंतर हा विषय पुढील अभ्यासासाठी मंत्री गटाकडे पाठवण्यात आला आहे. मंत्री गटाला त्यांचा हा अहवाल ऑक्टोबर 2024 पर्यंत सादर करायचा आहे. त्यामुळे आता नोव्हेंबर 2024 मध्ये होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा होणार आहे.
(फोटो सौजन्य – istock)
आजच्या बैठकीतील आतापर्यंतचे मोठे निर्णय?
– जीएसटी परिषदेने उपकर भरपाईवर मंत्र्यांचा गट स्थापन करण्यावर सहमती दर्शवली आहे.
– जीएसटी कौन्सिलने नमकीनवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.
– आत्तापर्यंत जीएसटी कौन्सिलची बैठक फक्त दिल्लीतच होत होती. मात्र, आता शेवटची 55 वी बैठक दिल्लीत होणार आहे. त्यानंतर मात्र, 56 वी बैठक ही दिल्लीबाहेर इतर राज्यांमध्ये होणार आहे. याबाबत आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
– जीएसटी कौन्सिलने परदेशी विमान कंपन्यांच्या सेवा आयातीवर सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
– कारच्या सीटवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आला आहे.