ओला इलेक्ट्रिकचा पाय आणखी खोलात, कुणाल कामरांसोबतच्या वादानंतर केंद्र सरकार करणार चौकशी!
देशातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीमागील शुक्लकाष्ट काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये. कंपनीने अलिकडेच आपल्या टू-व्हीलरबाबत आलेल्या 10,644 तक्रारींपैकी 99.1 टक्के तक्रारींचे निराकरण केल्याचा दावा केला होता. याबाबत कॉमेडियन कुणाल कामरा .यांच्या माध्यमातून समाजमाध्यमांवर बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर आता केंद्रिय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार विभागाने ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या या दाव्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कंपनीचा पाय आणखीनच खोलात जाणार आहे.
15 दिवसांच्या आत नोटीशीला उत्तर देण्याचे आदेश
ओला इलेक्ट्रिकने स्वतः आपल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले होते की, कंपनीला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून नोटीस मिळाली आहे. 15 दिवसांच्या आत या नोटीशीला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. 21 ऑक्टोबर 2024 रोजी स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत ओला इलेक्ट्रिकने सांगितले की, ओला इलेक्ट्रिककडे वाहनांबाबत ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी सर्वसमावेशक यंत्रणा आहे. आम्ही सूचित करू इच्छितो की, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या एकूण 10,644 तक्रारींपैकी 99.1 टक्के तक्रारींचे निराकरण ओला इलेक्ट्रिकच्या मजबूत निवारण यंत्रणेच्या अंतर्गत ग्राहकांच्या पूर्ण समाधानासाठी करण्यात आले आहे.
याबाबत एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राने सूत्रांचा हवाला देत आपल्या अहवालात म्हटले आहे की, ग्राहक व्यवहार विभाग ओला इलेक्ट्रिकच्या या दाव्याची चौकशी करेल आणि मंत्रालय अशा ग्राहकांशीही संपर्क साधेल. ज्यांनी कंपनीच्या खराब सेवा अर्थात टू-व्हीलरबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार केली होती. ओला वैयक्तिकरित्या त्यांच्याशी संपर्क साधेल आणि इलेक्ट्रिकच्या दाव्याची पुष्टी करेल.
समाजमाध्यमावर तापले प्रकरण
कॉमेडियन कुणाल कामरा आणि ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांच्यात सोशल मीडियावर झालेल्या वादानंतर, कुणाल कामरा अजूनही सोशल मीडियावर कंपनीला लक्ष्य करत आहे. कुणाल कामरा यांनी 29 ऑक्टोबर 2024 रोजी एका पोस्टला उत्तर देताना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणावरही हल्ला चढवला होता. तसेच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) झोपेत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता सीसीपीएने हे पाऊल उचलले आहे.
काय आहे शेअरची स्थिती
दरम्यान, याआधी मंगळवारी (ता.29) ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा शेअर स्टॉक एक्सचेंजवर प्रथमच त्याच्या आयपीओ किंमत 76 रुपयांच्या खाली घसरला. कंपनीचे शेअर्स प्रथमच आयपीओ किंमत 76 रुपयांच्या खाली घसरले. ही घसरण जवळपास 74.84 रुपयांपर्यंत नोंदवली गेली. तथापि बुधवारी (ता.30) ऑक्टोबरच्या ट्रेडिंग सत्रात ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स 3.13 टक्क्यांच्या वाढीसह 78.71 रुपयांवर व्यवहार करत आहेत.