फोटो सौजन्य - Social Media
पोलिस स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर दि. २ ते ८ जानेवारीदरम्यान साजऱ्या होत असलेल्या पोलिस रेजिंग डे सप्ताह–२०२६ अंतर्गत ग्रामीण पोलिस मुख्यालयात विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी माहितीपूर्ण, अनुभवाधारित व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे पोलिस दलाची कार्यपद्धती, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि आधुनिक साधनसज्जता यांचा प्रत्यक्ष अनुभव नागरिकांना घेता येत आहे.
या सप्ताहांतर्गत चैतन्य टेक्नो स्कूलमधील १२० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षकांसह पोलिस मुख्यालयास शैक्षणिक भेट दिली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि पोलिस उप अधीक्षक गौतम पातारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पोलिस विभागाची रचना, शिस्तबद्ध कार्यप्रणाली, कायद्याचे महत्त्व तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी सोप्या भाषेत उत्तरे देत पोलिसिंगविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला.
विद्यार्थ्यांसाठी शस्त्र विभागाची माहिती, श्वान पथकाचे थरारक प्रात्यक्षिक, फॉरेन्सिक व्हॅनद्वारे वैज्ञानिक तपास पद्धती, अंगुलीमुद्रा तज्ज्ञांचे कार्य तसेच दंगा नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या विशेष वाहनाचे सादरीकरण करण्यात आले. यामुळे गुन्हे तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतो, हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता आले.
याशिवाय डायल-११२ आपत्कालीन सेवेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, सायबर युनिटमार्फत सायबर गुन्हे व ऑनलाईन फसवणूक प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन, वाहतूक शाखेमार्फत रस्ते सुरक्षा नियमांची माहिती तसेच भरोसा सेलमार्फत महिलांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध मदत यंत्रणांची माहिती देण्यात आली. या सत्रांमुळे दैनंदिन जीवनात कायदा व सुरक्षिततेबाबतची जाणीव अधिक बळकट झाली.
पोलिस मुख्यालयातील गोकुळ मैदानावर उभारण्यात आलेल्या प्रदर्शनात अत्याधुनिक शस्त्रसाठा, बॉम्बशोधक व नाशक पथक, दामिनी पथक, महिला व बालविषयक कायदे, बालविवाहाचे दुष्परिणाम तसेच पोलिस काका–पोलिस दीदी संकल्पनेतून जनजागृती करण्यात येत आहे. हे प्रदर्शन रविवार वगळता दि. ८ जानेवारीपर्यंत खुले राहणार आहे. हा उपक्रम पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन पोलिस दलाच्या कार्याची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या सप्ताहामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलिस दलाबद्दल आदर, विश्वास व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत असल्याचे चित्र आहे.






