फोटो सौजन्य - Social Media
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मानसिक ताण ही सर्वसामान्य समस्या बनली आहे. कामाचा ताण, अनियमित दिनचर्या, चुकीच्या सवयी यांचा थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होत आहे. या सगळ्यामागे शरीरातील कोर्टिसोल हा मुख्य ‘स्ट्रेस हार्मोन’ मोठी भूमिका बजावत असतो. ताणतणावाच्या प्रसंगी शरीराला सावरण्यासाठी कोर्टिसोल आवश्यक असतो; मात्र तो दीर्घकाळ जास्त प्रमाणात राहिल्यास आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होऊ शकतात.
कोर्टिसोलचे प्रमाण सतत वाढलेले राहिल्यास झोपेचा त्रास, मेटाबॉलिजम बिघडणे, चिडचिड, थकवा, एकाग्रतेचा अभाव आणि शारीरिक रिकव्हरी मंदावणे असे परिणाम दिसून येतात. अनेकदा आपण या समस्यांसाठी केवळ कामाच्या दबावालाच जबाबदार धरतो. पण प्रत्यक्षात आपल्या दैनंदिन काही सवयी उशिरापर्यंत जागणे, वेळेवर न खाणे, स्क्रीनचा अतिवापर कोर्टिसोलच्या नैसर्गिक चक्रात गडबड निर्माण करतात. यासंदर्भात डॉक्टर कुनाल सूद (MD) यांनी एका व्हिडिओद्वारे अशा सहा महत्त्वाच्या चुकांची माहिती दिली आहे, ज्या नकळत मानसिक ताण वाढवत आहेत. रात्रीच्या वेळी कोर्टिसोलचे प्रमाण कमी होणे अपेक्षित असते, जेणेकरून शरीर आणि मेंदूला विश्रांती मिळेल. मात्र अपुरी किंवा खराब झोप झाल्यास संध्याकाळपर्यंतही कोर्टिसोल वाढलेले राहते. दीर्घकाळ कमी झोप घेतल्यास दुसऱ्या दिवशी ताण सहन करण्याची क्षमता कमी होते आणि मानसिक थकवा वाढतो.
व्यायाम आरोग्यासाठी फायदेशीर असला, तरी क्षमतेपेक्षा जास्त कसरत केल्यास तोच ताणाचे कारण ठरू शकतो. व्यायामादरम्यान कोर्टिसोल तात्पुरता वाढतो, पण योग्य विश्रांती न मिळाल्यास त्याचे प्रमाण असामान्य राहते, ज्यामुळे मानसिक तणाव वाढतो. दिवसभरात अनेक कप चहा किंवा कॉफी पिण्याची सवय कोर्टिसोल वाढवू शकते. कॅफिनमुळे शरीरात ACTH आणि कोर्टिसोलचे स्रवण वाढते. त्यामुळे मेंदू शांत राहत नाही आणि सतत अस्वस्थता जाणवते. कामाच्या गडबडीत नाश्ता किंवा जेवण चुकवणे ही सवय शरीरासाठी ‘मेटाबॉलिक स्ट्रेस’ ठरते. दीर्घकाळ उपाशी राहिल्यास रक्तातील साखर संतुलित ठेवण्यासाठी शरीर कोर्टिसोल वाढवते. यामुळे चिडचिड आणि अशक्तपणा जाणवतो.
झोपण्यापूर्वी मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहण्याची सवय कोर्टिसोल वाढवते. ब्लू लाइटमुळे मेलाटोनिन हार्मोन दबला जातो, झोपेची गुणवत्ता घसरते आणि संध्याकाळीही ताण टिकून राहतो. सततचा भावनिक तणाव HPA अॅक्सिस सक्रिय करतो, ज्यामुळे कोर्टिसोलचे संतुलन बिघडते. नकारात्मक विचार, चिंता आणि दडपलेले भावनादेखील मानसिक ताण वाढवतात.
डॉक्टर सूद यांच्या मते, या सवयी ओळखून त्यात बदल केल्यास कोर्टिसोल नियंत्रित ठेवणे शक्य आहे. पुरेशी झोप, वेळेवर व संतुलित आहार, नियमित पण मर्यादित व्यायाम आणि डिजिटल डिटॉक्स यामुळे मानसिक आरोग्य सुधारू शकते.






