कांद्याचे भाव पुन्हा 4000 रुपये क्विंटलच्या पार
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अगोदर कांदा दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर हे १ रुपये प्रति किलोपर्यंत घसरले होते. ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. मात्र, आता लोकसभा निवडणूक संपताच कांदा दराने पुन्हा ४००० रुपये प्रति क्विंटलचा टप्पा पार केला आहे.
या बाजार समित्यांमध्ये मिळतोय ४००० रुपये भाव
सध्याच्या घडीला राज्यातील जुन्नर बाजार समितीत कांद्याला उच्चांकी 4110 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. याशिवाय मंचर बाजार समितीमध्ये देखील कांद्याला 4010 रुपये प्रति क्विंटल आणि अमरावती बाजार समितीमध्ये देखील कांद्याने ४००० रुपये क्विंटल टप्पा गाठला आहे. तर राज्यातील अन्य सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला सध्या ३००० ते ३५०० रुपये प्रति क्विंटलहुन अधिक दर मिळत आहे. ज्यामुळे आता कांदा दरात वाढ झाल्याने उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
(फोटो सौजन्य : istock)
चालू महिन्यात कांदा दराचा चढता आलेख
मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात कांद्याचे दर सरासरी ४००० रुपये प्रति क्विंटलच्या वरती होते. मात्र, ८ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळणे देखील मुश्किल झाले होते. मात्र, आता चालू महिन्याच्या सुरुवातीपासून कांद्याचे काहीसे चढे पाहायला मिळत असून, आता कांदा दराने ४००० रुपये प्रति क्विंटलचा टप्पा पार केला आहे. सध्या राज्यातील जुन्नर, मंचर आणि अमरावती या बाजार समित्यांमध्ये कांद्याला ४००० रुपये प्रति क्विंटलहुन अधिक दर मिळत आहे.
काय आहे शेतकऱ्यांची मागणी?
दरम्यान, मोठ्या अवधीनंतर कांद्याच्या दराने उसळी घेतली आहे. राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला आहे. ज्यामुळे सध्या कांद्याच्या दरात वाढ झाल्याने केंद्र सरकारने आता यामध्ये कोणताही हस्तक्षेप करू नये. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळत असताना निर्यातबंदी सारखा निर्णय घेऊ नये, अशीच आशा कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.