आता आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकावरूनही भारतात पेमेंट शक्य
भारतातील अग्रगण्य फिनटेक आणि मर्चंट पेमेंट्स कंपनी पेटीएम (One97 Communications Ltd.) ने मोठी घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले की आता 12 देशांतील एनआरआय (Non-Resident Indians) आपला आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांक वापरून पेटीएम ॲपवर लॉगिन करू शकतात आणि त्यांच्या NRE किंवा NRO खात्यांद्वारे UPI पेमेंट्स सहजपणे करू शकतात.
ही नवी सुविधा NPCI (National Payments Corporation of India) च्या साहाय्याने सुरू करण्यात आली आहे आणि ती सध्या सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, ओमान, कतार, अमेरिका, सौदी अरेबिया, यूएई, यूके, फ्रान्स आणि मलेशिया या 12 देशांतील भारतीयांसाठी उपलब्ध आहे.
Gold Silver Rate Crashed: 7 दिवसात सोन्याचांदीचे भाव गडगडले, सोने 8 तर चांदी 13 हजाराने स्वस्त
या उपक्रमामुळे एनआरआय आता भारतातील दुकाने, रेस्टॉरंट्स, व्यापारी तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर QR कोड स्कॅन करून थेट पेमेंट करू शकतील. यासाठी त्यांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय पेमेंट गेटवे किंवा चलन रूपांतरणाची आवश्यकता राहणार नाही. तसेच ते आपल्या NRE/NRO खात्यांदरम्यान पैसे ट्रान्सफर करू शकतील किंवा कोणत्याही UPI ID अथवा UPI लिंक्ड मोबाइल नंबरवर त्वरित पैसे पाठवू शकतील.
पेटीएम प्रवक्त्यांनी सांगितले, “भारतासाठी, भारतात तयार केलेल्या तंत्रज्ञानाने प्रत्येक भारतीयाला जोडण्याचे आमचे स्वप्न आहे. आता एनआरआयंना त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून पेटीएम UPI वापरण्याची परवानगी देणे ही त्या प्रवासातील पुढची महत्त्वाची पायरी आहे.”
या नव्या उपक्रमामुळे “मेड इन इंडिया फिनटेक” संकल्पना आणखी बळकट होणार असून, भारतातील डिजिटल पेमेंट्सचे तंत्रज्ञान जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे. पेटीएमच्या या पावलामुळे केवळ एनआरआयंना नव्हे तर भारताच्या आर्थिक डिजिटल पायाभूत सुविधांनाही नवीन गती मिळणार आहे.






