बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेचा भारतीय शेतकऱ्यांना फटका; वाचा... नेमका कसा तो?
राज्यासह देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आणि एकूणच भारतीय कापड उद्योगाला मोठा फटका बसणार आहे. ब्राझीलनंतर भारत हा बांगलादेशला कापूस पुरवठा करणारा दुसरा सर्वात मोठा देश आहे. दरम्यान, चीन, पाकिस्तान व बांगलादेश हे भारतीय कापसाचे मोठे आयातदार आहेत. मात्र, भारतीय कापूस निर्यात ही सर्वाधिक बांगलादेशला होते. परिणामी, आता भारतीय कापूस निर्यातीवर याचा मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे.
भारतीय कापसाची मोठी बाजारपेठ
बांगलादेशात ८५ पेक्षा जास्त टेक्स्टाइल कारखाने आहेत. मात्र, या कारखान्यांची गरज भागवणारे कापूस उत्पादन त्या देशात होत नाही. त्यामुळे बांगलादेशी कापड व्यवसायाची ९० टक्के गरज ब्राझील आणि भारतीय कापसाकडून भागवली जाते. त्यामुळे भारतीय कापसासाठी बांगलादेश ही मोठी बाजारपेठ आहे. इतकेच नाही तर 2006 पासून भारतातील अनेक कापड कंपन्यांनी बांगलादेशकडे मोर्चा वळवला. या कंपन्या भारतातून कापूस निर्यात करून बांग्लादेशात वस्रनिर्मिती करतात. मात्र, आता या कंपन्यांच्या व्यवसायावर देखील आता बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा थेट परिणाम होणार आहे. परिणामी, भारतीय कापूस निर्यातीला मोठा फटका बसणार आहे.
हेही वाचा : ‘या’ भारतीय कंपन्यांची चिंता वाढली; बांग्लादेशातील अस्थिरतेमुळे गुंतवणूक धोक्यात!
कापड निर्यातीत बांगलादेश भारतापेक्षा पुढे
बांगलादेशात कमी वेतनात मिळणारे मजूर आणि हलकी वाहतूक असल्याने भारतातातुन कापूस निर्यात करणे सहजसोपे असल्याने या कंपन्यांनी 2006 पासून बांगलादेशात मोठी गुंतवणूक केली आहे. परिणामी, भारतीय कंपन्यांच्या जोरावर कापड निर्यातीत बांगलादेश भारतापेक्षा खूप पुढे आहे. 2013 ते 2023 दरम्यान, बांगलादेशातील कपड्यांचे उत्पादन 69.6 टक्के, तर व्हिएतनामचे 81.6 टक्के दराने वाढले आहे. तर भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण कापड निर्यातीपैकी, भारताची वस्त्र निर्यात केवळ 4.6 टक्के दराने वाढली आहे. त्यामुळे जागतिक वस्त्र व्यापारातील भारताचा वाटा सातत्याने कमी होत आहे.
हेही वाचा : बांग्लादेशात राजकीय अस्थिरता; संकट मात्र भारतावर, वाचा… नेमका काय परिणाम होणार?
भारतापेक्षा 3 पटीने जास्त कापड निर्यात
2022-23 मध्ये भारतातून तयार कपड्यांची निर्यात 16 अब्ज डॉलर्सची होती, तर याच कालावधीत बांगलादेशने 47 अब्ज डॉलर्सच्या भारताच्या तुलनेत 3 पटीने जास्त कापड निर्यात केली. पण बांगलादेशातील राजकीय अस्थिरता आणि अशांतता यामुळे आता भारतीय गारमेंट कंपन्यांना आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. एकूणच भारतीय कापूस निर्यात धोक्यात येणार आहे.