'या' भारतीय कंपन्यांची चिंता वाढली; बांग्लादेशातील अस्थिरतेमुळे गुंतवणूक धोक्यात!
अलीकडील काही वर्षांमध्ये भारतीय कॉर्पोरेट क्षेत्राने बांग्लादेशमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळेच बांग्लादेशची अर्थव्यवस्था मजबुत झालेली पाहायला मिळाली. तेथील मोठी लोकसंख्या, नैसर्गिक वायूचे साठे आणि स्वस्त मजूर यामुळे भारतीय कंपन्यांनी बांगलादेशमध्ये मोठी गुंतवणूक केली. बांग्लादेश हा भारतासाठी आग्नेय आशियाचा प्रवेशद्वारही देखील मानला जातो. बांगलादेशशी भारताचे आर्थिक आणि राजकीय संबंध इतर शेजारी देशांपेक्षा खूपच चांगले आहेत. ज्यामुळे भारतातील कंपन्यांनी त्या ठिकाणी मोठी गुंतवणूक केली. मात्र, आता ही गुंतवणूक धोक्यात आली आहे.
कंपन्यांच्या गुंतवणुकीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला. तसेच त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. ज्यामुळे सध्या बांगलादेशच्या लष्कराने सत्ता हाती घेतल्याने, भारतीय कॉर्पोरेट कंपन्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांत बांगलादेशमध्ये हिंसाचार वाढला आहे. ज्यामुळे आता या कंपन्यांच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. भारतीय कॉर्पोरेट क्षेत्राने बांगलादेशातील वस्त्रोद्योग, उर्जा, फार्मास्युटिकल्स यासारख्या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. ज्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे आणि स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत.
हेही वाचा : बांग्लादेशात राजकीय अस्थिरता; संकट मात्र भारतावर, वाचा… नेमका काय परिणाम होणार?
या कंपन्यांनी केलीये बांग्लादेशात गुंतवणूक
अनिल अंबानी यांच्या अंबानी समूहाची ऊर्जा कंपनी रिलायन्स पॉवर, अदानी समूह, सार्वजनिक क्षेत्रातील वीज कंपनी एनटीपीसी यांनीही बांगलादेशमध्ये गुंतवणूक केली आहे. याशिवाय टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, सन फार्मा, गोदरेज आणि सीएटी टायर्स यांच्या उत्पादन सुविधा बांगलादेशमध्ये आहेत.
अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरने देखील बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाच्या सहकार्याने ढाक्याजवळ मेघनाघाट येथे 3000 मेगावॅट क्षमतेचा एलएनजी आधारित ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. याशिवाय कंपनी पेट्रोबांग्लाच्या सहकार्याने चटगावमध्ये एलएनजी टर्मिनलही उभारत आहे. गौतम अदानी यांच्या अदानी पॉवर लिमिटेडची उपकंपनी असलेली अदानी पॉवर, झारखंडमधील गोड्डा येथे असलेल्या पॉवर प्लांटमधून बांगलादेशला 1600 मेगावॅट वीज पुरवठा करत आहे.