90 तास काम करण्याच्या फॉर्म्युल्यावर Bajaj Auto च्या मॅनेजिंग डायरेक्टरचे परखड मत, म्हणाले...
देशातील अग्रगण्य कंपनी L&T चे चेअरमेन एस एन सुब्रमण्यम यांनी एक विधान केले होते. ज्यामुळे आता सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. खरंतर, सुब्रमण्यम यांनी त्यांच्या एका विधानात म्हटले होते की कर्मचाऱ्यांनी दर आठवड्याला ९० तास काम करावे. याशिवाय त्यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करावे.
त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर एका वेगळ्याच प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. आता विविध क्षेत्रातील दिग्गजही या विधानावर आपले मत देत आहेत. आता बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर राजीव बजाज यांनीही यावर आपले विचार मांडले आहे. चला, ९० तासांच्या कामाच्या फॉर्म्युल्याबद्दल त्यांनी काय म्हटले आहे त्याबद्दल जाणून घेऊया.
शुक्रवारी CNBC-TV18 शी बोलताना, बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज म्हणाले की, जर तुम्हाला 90 तासांच्या कामाचा ट्रेंड सुरू करायचा असेल तर तो सिस्टमच्या वरच्या थरापासून सुरू झाला पाहिजे. याशिवाय राजीव बजाज म्हणाले की, तुम्ही किती तास काम करता हे महत्त्वाचे नाही. त्याऐवजी, तुम्ही तुमचे काम किती चांगले करता हे महत्त्वाचे आहे. त्यांनी त्यांच्या भाषणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, ते म्हणाले, “आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक दयाळू आणि सौम्य जगाची आवश्यकता आहे.”
एकीकडे सोशल मीडियावर एल अँड टीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम यांच्या विधानाचा जोरदार विरोध होताना दिसत आहे. दुसरीकडे, लोक राजीव बजाज यांच्या विधानाचे कौतुक करत आहेत. याआधी इन्फोसिसचे अध्यक्ष नारायण मूर्ती यांनीही म्हटले होते की तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करावे. यानंतर नारायण मूर्ती यांच्यावर टीकेची झोड उडाली होती.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारत हा जगातील सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या देशांच्या यादीत आपले स्थान बनवून आहे, जिथे सरासरी आठवड्यात ५०.३ तास काम केले जाते. या यादीत UAE (५०.९ तास) सर्वात वर आहे. पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि बांगलादेश चौथ्या क्रमांकावर आहे, जिथे लोक ४९.९ तास काम करतात.
संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अलिकडच्या अहवालांनी जगाला जास्त वेळ काम करण्याच्या गंभीर परिणामांबद्दल इशारा दिला आहे. अहवालांनुसार, जास्त काम केल्याने केवळ मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत नाही तर त्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. २०२१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, 2016 मध्ये कामाशी संबंधित कारणांमुळे 19 लाख मृत्यू झाले.