'या' मराठमोळ्या कंपनीची शेअर बाजारात जोरदार एन्ट्री; पहिल्याच दिवशीच गुंतवणूकदार मालामाल!
महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील एका साडी विक्री करणाऱ्या कंपनीने शेअर बाजारात दमदार पदार्पण केले आहे. कंपनीच्या शेअरमुळे पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला आहे. सरस्वती साडी डेपो असे या कंपनीचे नाव असून, या कंपनीचे शेअर्स मंगळवारी (ता.२०) शेअर बाजारात लिस्टींग झाले आहेत. कंपनीचा हा शेअर 25 टक्के प्रीमियमसह मुंबई शेअर बाजारात (बीएसई) झाला आहे. दरम्यान, गुंतवणूकदारांना कंपनीच्या प्रत्येक शेअरवर 40 रुपये नफा झाला आहे.
आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद
सरस्वती साडी डेपो या कोल्हापुर येथील साडी विक्री करणाऱ्या कंपनीचा आयपीओ नुकताच 12 ऑगस्ट रोजी खुला झाला होता. ज्यामध्ये गुंतवणूकदारांनी 14 ऑगस्टपर्यंत पैसे गुंतवण्याची संधी होती. या आयपीओद्वारे कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 10,000,800 शेअर्ससाठी विक्रीसाठी ठेवले होते. विशेष म्हणजे कंपनीच्या या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.
किती रुपयांवर झालीये शेअरची लिस्टिंग
सरस्वती साडी डेपो कंपनीच्या शेअर्सच्या आयपीओची किंमत 152-160 रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती. त्यात वाढ होऊन मंगळवारी (ता.२०) या शेअरची किंमत बीएसईवर 200 रुपयांवर पोहोचली आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) वर सरस्वती साडी डेपोचे शेअर्स 21.25 टक्के प्रीमियमसह 194 रुपयांवर लिस्टिग झाले आहे. दरम्यान, बाजार तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सची किंमत 200 ते 210 रुपयांच्या आसपास लिस्टिंग होण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
पहिल्याच दिवशी प्रत्येक लॉटवर 3600 रुपये नफा
सरस्वती साडी कंपनीच्या आयपीओअंतर्गत 90 शेअर्सची लॉट साइज सेट करण्यात आली होती. अर्थात गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये किमान 14,400 रुपये गुंतवणे आवश्यक होते. ज्यातून गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी प्रत्येक लॉटवर तब्बल 3600 रुपये नफा झाला आहे. आयपीओअंतर्गत ज्या गुंतवणूकदारांनी जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावली होती आणि 1170 शेअर्ससाठी 1,87,200 रुपये गुंतवले होते. त्यांना पहिल्याच या कंपनीच्या शेअरमुळे 2,34,000 रुपये इतका फायदा झाला आहे.
काय करते ही कंंपनी
साडी उत्पादनाशी निगडित ही कोल्हापूरची कंपनी महिलांच्या कपड्यांचा पुरवठा करते. यामध्ये लेहेंगा, कुर्ती आणि महिलांच्या इतर कपड्यांचा समावेश आहे. ही कंपनी 1966 मध्ये स्थापन झाली आणि तिचा व्यवसाय देशभर पसरलेला आहे. या कंपनीचा 90 टक्क्यांहून अधिक महसूल केवळ साड्यांच्या विक्रीतून येतो.