फोटो सौजन्य - Social Media
नव्या वर्षाची सुरुवात होताच शेअर बाजारात पुन्हा एकदा आयपीओ (IPO)ची जोरदार हालचाल पाहायला मिळणार आहे. २०२६ च्या पहिल्याच महिन्यात अनेक मोठ्या कंपन्या बाजारात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे रिटेल गुंतवणूकदारांचाही उत्साह वाढलेला आहे. मात्र अनेकदा गुंतवणूकदार ‘ग्रे मार्केट प्रीमियम’ (GMP) किंवा सोशल मीडियावरील चर्चांच्या आधारावरच पैसे गुंतवतात आणि हीच चूक त्यांना महागात पडते. तज्ज्ञांच्या मते, आयपीओमधील खरी कमाई ही केवळ चर्चांवर नव्हे, तर कंपनीच्या आर्थिक आकडेवारी आणि मूलभूत ताकदीवर आधारित असते. जर तुम्हालाही २०२६ मध्ये आयपीओतून चांगला नफा मिळवायचा असेल, तर बाजारातील गोंगाट बाजूला ठेवून काही महत्त्वाच्या तांत्रिक आणि मूलभूत बाबी समजून घेणे आवश्यक आहे.
सर्वात आधी कंपनीचा व्यवसाय नेमका काय आहे, हे समजून घ्या. कंपनी पैसा कसा कमावते आणि तिच्याकडे अशी कोणती ताकद आहे का, जी स्पर्धक सहज हिरावून घेऊ शकत नाहीत? ही ताकद मजबूत ब्रँड, खास तंत्रज्ञान किंवा व्यापक वितरण जाळ्याच्या स्वरूपात असू शकते. जर कंपनीची ४० ते ६० टक्के कमाई केवळ ४-५ मोठ्या ग्राहकांवर अवलंबून असेल, तर तो धोका मानला जातो. तसेच कंपनी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे, त्या क्षेत्रात भविष्यात वाढीची किती संधी आहे, हेही तपासणे महत्त्वाचे आहे. फक्त मागील एका वर्षाचा नफा पाहून निर्णय घेऊ नका. किमान गेल्या ३ ते ५ वर्षांचा आर्थिक कामगिरी अहवाल तपासा. कंपनीची विक्री आणि नफा दरवर्षी सातत्याने वाढत आहे का, की आयपीओच्या आधीच अचानक उडी घेतलेली दिसते? अनेक वेळा कंपन्या आयपीओपूर्वी आकडे आकर्षक दाखवण्याचा प्रयत्न करतात. यासोबतच कागदावर दाखवलेला नफा प्रत्यक्षात रोख स्वरूपात कंपनीकडे येतो आहे का, हेही पाहणे गरजेचे आहे.
कर्जाचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. कितीही चांगली कंपनी असली, तरी जादा कर्जामुळे ती अडचणीत येऊ शकते. कंपनीवर एकूण किती कर्ज आहे आणि तिचे उत्पन्न ते कर्ज फेडण्यास पुरेसे आहे का, याचा अंदाज घ्या. दैनंदिन खर्चासाठीही जर कंपनीकडे पुरेशी रोख रक्कम नसेल, तर ती धोक्याची घंटा समजावी. कंपनीचे व्यवस्थापन आणि प्रवर्तक (प्रमोटर्स) यांची विश्वासार्हता देखील महत्त्वाची असते. प्रमोटरचा अनुभव, त्यांचा मागील इतिहास, तसेच पूर्वी कोणते वाद किंवा गैरप्रकार झाले आहेत का, याची माहिती घ्या. आयपीओनंतर प्रमोटरकडे किती हिस्सा उरतो, हेही पाहा. जर प्रमोटर मोठ्या प्रमाणात आपला हिस्सा विकून बाहेर पडत असतील, तर त्याचा अर्थ कंपनीच्या भविष्यात त्यांचा विश्वास कमी असू शकतो.
आयपीओमधून उभारलेला पैसा नेमका कशासाठी वापरला जाणार आहे, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. व्यवसाय विस्तार, नवीन प्रकल्प, कारखाना किंवा तंत्रज्ञानासाठी पैसा वापरला जाणार असेल, तर तो सकारात्मक संकेत मानला जातो. मात्र केवळ जुने कर्ज फेडण्यासाठीच पैसा उभारला जात असेल, तर गुंतवणूकदारांनी सावध राहावे. यासोबतच ‘फ्रेश इश्यू’ आणि ‘ऑफर फॉर सेल’ (OFS) यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. शेवटी आयपीओची किंमत योग्य आहे का, याचे मूल्यांकन करा. त्याच क्षेत्रातील इतर सूचीबद्ध कंपन्यांशी तुलना करून पाहा. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP)मधील ‘रिस्क फॅक्टर्स’ विभाग दुर्लक्षित करू नका. योग्य माहिती, संयम आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णयच आयपीओमधील यशाची खरी गुरुकिल्ली ठरतो.






