याप्रसंगी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी संदीप पाबळे आणि ऋषी होळकर यांनी देखील उपस्थित महिलांना प्रोत्साहित करत फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. प्रशिक्षिका म्हणून सी.आर.पी. सीमा रांजणे यांनी महिलांना व्यवसायातील बारकावे आणि तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्यास मोलाची मदत केली. या प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. कार्यक्रमाला सुनीता बेलोशे, सुजाता गोळे, शोभा रांजणे, शोभा मानकुमरे, सुलभा मानकुमरे, लीलाबाई मानकुमरे, बेबी धनावडे, शुभांगी राजपुरे, सुजाता मानकुमरे, सुरेखा मानकुमरे यांसह विविध महिला बचत गटांच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रेवंता खादी फाउंडेशनने सामाजिक बांधिलकीतून ‘दापयडी’ हे गाव दत्तक घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या विचारात आहे. या उपक्रमांतर्गत गावातील प्रत्येक घराला खादीच्या धाग्याशी जोडण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून येथील प्रत्येक महिलेला खादी विणकाम आणि धागा निर्मितीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. केवळ प्रशिक्षण देऊन न बांबता, उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यामुळे दापवडी भविष्यात ‘खादीचे गाव म्हणून ओळखले जाईल. या निर्णयामुळे गावातील महिलांना घराबाहेर न पडता सन्मानाने रोजगार मिळणार असून, आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने दापवडी गावाचे हे पाऊल इतर गावासांठी आदर्श ठरणार आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी पाबळे यानी खादी आणि ग्रामोद्योगाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा नवा मार्ग अधोरेखित केला, पाबळे गेल्या अनेक दिवसांपासून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी जमिनीवर काम करत आहेत. खादीच्या माध्यमातून त्यांनी केवळ धागा बनवण्याचेच नव्हे, तर खादीपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रगत प्रशिक्षण घेऊन महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या महिलांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. प्रमाणपत्र हातात पडल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान आणि स्वावलंबनाची जिद्द दिसून येत होती.






