फोटो सौजन्य - Social Media
२०२५ मध्ये भारतीय शेअर बाजारात आतापर्यंत जवळपास ३ टक्क्यांची घसरण झाली आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांची (FII) मोठ्या प्रमाणातील विक्री आहे. गेल्या ५ महिन्यांपासून एफआयआय बाजारातून पैसे काढत आहेत. २४ जानेवारीपर्यंत त्यांनी बाजारातून तब्बल ६९,०८० कोटी रुपये बाहेर काढले आहेत. हे २०२३च्या एकूण रकमेच्या चारपट अधिक आहे. याचा अर्थ, जेवढी रक्कम एफआयआय ने एकूण वर्षभरात बाजारातून काढली होती, तेवढी रक्कम त्यांनी काही महिन्यांतच काढली आहे.
या विक्रीने बाजारावर मोठा परिणाम होणे अपेक्षित होते, पण भारतीय लहान गुंतवणूकदार SIP च्या माध्यमातून बाजारातील स्थिरता टिकवून ठेवत आहेत. लहान बचतीसाठी SIP एक उत्तम पर्याय आहे. एडलवाइस म्युच्युअल फंडच्या सीईओ राधिका गुप्ता यांनी SIP च्या फायद्यांवर प्रकाश टाकला आहे. त्या म्हणाल्या, “SIP द्वारे गुंतवणूक करणाऱ्यांना दीर्घकालीन फायदा होतो. बाजार सरासरी परतावा देत असला तरी, १० वर्षांच्या SIP गुंतवणुकीत चांगला परतावा मिळू शकतो.” मासिक SIP योगदान सध्या २६,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. या SIP चे सामूहिक विश्वास बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
राधिका गुप्ता यांचे असे मत आहे की आज कोट्यवधी सामान्य गुंतवणूकदार SIP चा वापर करतात आणि त्यावर विश्वास ठेवतात. हा सामूहिक विश्वास दरमहा २६,००० कोटी रुपयांच्या SIP योगदानातून दिसून येतो. याच सामूहिक विश्वासामुळे FII च्या विक्रीदरम्यान भारतीय भांडवली बाजार स्थिर राहतो. यावर राधिका गुप्ता यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर लिहिताना सांगितले, “आज, कोट्यवधी सामान्य गुंतवणूकदार SIP चा वापर करतात आणि त्यावर विश्वास ठेवतात. हा सामूहिक विश्वास दरमहा २६,००० कोटी रुपयांचा आहे आणि याच सामूहिक विश्वासामुळे FII च्या विक्रीदरम्यान भारतीय बाजार स्थिर राहतो.”
SIP ने भारतीय रिटेल इक्विटी संस्कृती जलदगतीने निर्माण केली आहे. हे असं साधन आहे, जे अनेक देश अजूनही करू शकलेले नाहीत. पूर्वी इक्विटी बाजाराला फक्त सट्टेबाजार मानले जात होते, पण आज सामान्य लोक नियमित बचत करून मोठे SIP पोर्टफोलिओ तयार करत आहेत. SIP ला बळकट समर्थन मिळाल्याने अनेक भारतीय गुंतवणूकदार आपल्या भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित करत आहेत.
राधिका गुप्ता यांनी SIP ला “बचतीसोबत विकासाचे एक सोपे समाधान” मानले असून, हे भारतीय बचतीसाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे, असं त्यांचे मत आहे. ते म्हणाल्या, “SIP हे भारतीय बचतीसाठी एक महत्त्वाचे समाधान आहे. याला उपहास नाही, तर उत्सवाची गरज आहे. म्युच्युअल फंड आणि SIP यावर टीका करणारे लेख आणि गुंतवणूकदारांना अज्ञानी समजणारे दृषटिकोन काहीही उपयोगाचे नाहीत.” SIP ने केवळ गुंतवणुकीच्या गरजा पूर्ण केल्या आहेत, तर सामान्य भारतीय लोकांना नियमित बचत करण्याचा योग्य मार्ग दिला आहे. यामुळे बाजाराची स्थिरता कायम राखली गेली आहे आणि भविष्यातही भारतीय शेअर बाजारात चांगला विकास होण्याची आशा आहे.