सरकारी कंपनीने आठवड्याच्या शेवटी दिली लाभांशाची भेट; दुसऱ्या तिमाहीतील नफ्यात काहीशी घट!
आठवड्याच्या शेवटी सरकारी मिनिरत्न कंपनी एमएसटीसी लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने शनिवारी (9 नोव्हेंबर) आपले तिमाही निकाल जाहीर केले. निकालांसह 40 टक्क्यांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफा आणि उत्पन्नात घट झाली आहे. शुक्रवारी (8 नोव्हेंबर) शेअर 2.90 टक्क्यांच्या घसरणीसह 637.10 रुपयांवर बंद झाला आहे.
40 टक्क्यांचा लाभांश घोषित
एक्सचेंज फाइलिंगनुसार, कंपनीच्या संचालक मंडळाने सप्टेंबर तिमाहीच्या निकालांसह गुंतवणूकदारांसाठी चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी 10 रुपयांच्या दर्शनी मूल्यावर 4 रुपये (40 टक्के) अंतरिम लाभांश जाहीर केला. संचालक मंडळाने लाभांशाची रेकॉर्ड तारीख 22 नोव्हेंबर 2024 निश्चित केली आहे. अंतरिम लाभांश त्याच्या घोषणेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत दिला जाईल.
एमएसटीसी लि. ही भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील मिनी रत्न श्रेणी-I पीएसयू आहे. कंपनीची स्थापना 9 सप्टेंबर 1964 रोजी फेरस भंगाराच्या निर्यातीसाठी नियामक प्राधिकरण म्हणून करण्यात आली. कंपनीमध्ये भारत सरकारचा 64.75 टक्के हिस्सा आहे. ही 1992 पर्यंत लोखंडी भंगाराची आयात आणि जुनी जहाजे मोडून काढण्यासाठी कॅनालिझिंग एजन्सी होती.
हे देखील वाचा – 35 पैशांच्या या शेअरने गुंतवणूकदारांना केले करोडपती; 1 लाखाचे झाले 70 लाख रुपये!
कंपनीचे तिमाही निकाल! उत्पन्न आणि नफ्यात घट
शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत एमएसटीसीचा नफा 12 टक्क्यांनी घटून 41.45 कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत नफा 47.13 कोटी रुपये होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 11.3 टक्क्यांनी घसरून 71.91 कोटी रुपये झाले. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत उत्पन्न 81.13 कोटी रुपये होते.
1 वर्षात सुमारे 50 टक्के परतावा
मिनीरत्न पीएसयू शेअरच्या कामगिरीवर नजर टाकल्यास एका आठवड्यात शेअर 5%, 2 आठवड्यात 2 टक्के, 3 महिन्यांत 30 टक्के आणि 6 महिन्यांत 23 टक्के घसरला आहे. या वर्षी आतापर्यंत शेअर 3 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. तसेच, मागील एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास 50 टक्के आणि मागील 2 वर्षात 127 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,165 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा निच्चांक 417.15 रुपये आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)