आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद; सेन्सेक्स 77,371 अंकांपर्यंत कोसळला!
इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो सारख्या आयटी शेअर्समध्ये जोरदार घसरण झाल्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. आयटी व्यतिरिक्त बहुतांश क्षेत्रांमध्ये वाढ झाली असली तरी आयटी समभागांमध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजार दबावाखाली आला आहे. आजच्या व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सेन्सेक्स 241 अंकांच्या घसरणीसह 77,371 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 79 अंकांच्या घसरणीसह 23,465 अंकांवर बंद झाला आहे.
कोणते शेअर्स आहेत तेजीत
आज (ता.१८) मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 14 शेअर वाढीसह बंद झाले आहे.16 शेअर हे घसरणीसह बंद झाले आहे. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 21 शेअर वाढीसह आणि 29 शेअर घसरणीसह बंद झाले आहे. वाढत्या शेअर्समध्ये टाटा स्टील, नेस्ले इंडिया, एचयूएल, एसबीआय, जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स, महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्स यांचा समावेश आहे. तर टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक आणि ॲक्सिस बँकेचा शेअर घसरणीसह बंद झाले आहेत.
या क्षेत्रातील शेअर्समध्ये झालीये वाढ
आज (ता.१८) शेअर बाजारात बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, रिअल इस्टेट, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर आयटी, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस, एनर्जी, मीडिया आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री दिसून आली आहे. आजच्या व्यवहारादरम्यान, निफ्टी मिडकॅप निर्देशांक सपाट बंद झाला तर निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक घसरणीसह बंद झाला आहे.
का झालीये भारतीय शेअर बाजाराची पडझड
भारतीय शेअर बाजाराच्या घसरणीत आयटी शेअर्सचा मोठा वाटा आहे. निफ्टीचा आयटी निर्देशांक एका वेळी 1200 हून अधिक अंकांनी घसरला होता आणि हा निर्देशांक 2.22 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला आहे. Infosys, TCS, Tech Mahindra, Wipro आणि LTIMindtree आणि HCL Tech समवेत निफ्टी IT निर्देशांकात समाविष्ट असलेले सर्व 10 शेअर बंद झाले.
यूएस फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी म्हटले आहे की, सेंट्रल बँकेने व्याजदर कमी करण्यासाठी घाई करण्याची गरज नाही. त्यांच्या या विधानामुळे अमेरिकन टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आणि त्याचा परिणाम भारतीय आयटी शेअर्सवरही झाला आहे. खरे तर भारतीय आयटी कंपन्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा अमेरिकेतून येतो.
दरम्यान, भारतीय कंपन्यांच्या निराशाजनक तिमाही निकालांव्यतिरिक्त, परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीनेही बाजार खाली आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेली एफआयआयची विक्री सुरूच आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)